सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून व सविस्तर चर्चा करून उजनी धरणातून कालवा, बोगदा, सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्याचा सकारात्मक निर्णय येत्या दोन-तीन दिवसात निश्चित घेतला जाईल, असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र अवर्षणग्रस्त परिस्थिती असून उजनी धरण विसर्ग स्त्रोतावर अवलंबून असलेल्या लाखो एकर लाभक्षेत्रातील ऊस, फळबागा, चारा वैरण अशी उभी पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहेत व शेतकरी प्रचंड धास्तावलेला आहे. सध्या उजनी धरणात १४ टक्के उपयुक्त पाणी असून ७.२२ टीएमसी पाणीसाठा तयार झालेला आहे. आगामी दोन ते अडीच महिनाच्या पावसाळ्यात धरणात आणखीन जादा पाणी येईल तेव्हा येईल परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी कालवा, भीमा- सीना जोड कालवा (बोगदा) सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना याद्वारे तातडीने पाणी सोडून उभ्या पिकांना जीवदान मिळावे म्हणून आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, कल्याणराव काळे आदी मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली.मुख्यमंत्री चर्चा करणार
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात उजनीतून पाणी सोडण्याविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा शब्द दिल्याचे आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.