सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात चांगलाच राडा झाला. हा प्रकार मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे आज सकाळी घडला.
काँग्रेसकडूनप्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. त्यामुळे त्यांनी गावभेट दौऱ्यात सुरवात केली आहे. आज त्या मंगळवेढा दौऱ्यावर आल्या असता, त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाटखळ येथील मराठा समाज बांधवांनी गावभेट दौऱ्याला विरोध करत, बैठकीत राडा केला. यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.
मनोज जरांगे पाटील यांनी पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार अनेक गावांमध्ये मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. मराठा समाजाने केलेल्या गावबंदीचा फटका आज काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसला. दरम्यान प्रणिती शिंदे यांनी बैठक न घेताच गावातून हताशपणे परतावे लागले.