सोलापूर/मुंबई - शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता. गुवाहाटीत असताना त्यांनी रफीक नावाच्या नगरसेवकाला केलेल्या संभाषणातील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... हे वाक्य तुफान गाजलं. अनेकांनी या डायलॉगवरुन मिम्स आणि गाणीही वाजवली. आता, तब्बल 15 दिवसांनी शहाजी बापू पाटील त्यांच्या सांगोला मतदारसंघात परतले आहेत. त्यावेळी मोठ्या जल्लोषात गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. हलगीच्या तालावर, फटक्यांची आतिषबाजी झाली.
राज्याच्या विधानसभेत सोमवारी बहुमत चाचणी घेण्यात आली आणि यात १६४ आमदारांच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे सरकार चाचणीत यशस्वी झालं. त्यामुळे, शिवसेनेतील बंडखोर आमदाराचं हे बंड यशस्वी झालं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणं झाली. तर, अजित पवारांनीही तुफान फटकेबाजी केली. यावेळी, त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या व्हायरल डायलॉगवरही भाष्य केलं होतं. त्यामुळे, शहाजी बापू पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावरही त्यांचे फॅन फॉलोविंग वाढले आहे. आता, आपल्या गावी आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.
आमदार शहाजी बापू पाटील यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं. फटाक्यांची आतिषबाजी आणि हलगीच्या तालावर कार्यकर्ते सांगोल्यात नाचताना दिसून आले.
सांगोला देश-विदेशात पोहोचला
शिवसेनेत बंड केल्यावर एकनाथ शिंदे जेवढे प्रकाशझोतात आले, त्यापेक्षा अधिक शहाजीबापू आले ते त्यांच्या अस्सल सोलापुरी ग्रामीण ढंगातील संवादामुळे. बंडानंतर शिंदे यांच्या गटात गेलेल्या काही मंत्री, आमदारांसह शहाजीबापू सध्या गुवाहाटीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असताना त्यांनी कार्यकर्त्याशी साधलेल्या संवादानंतर ‘बापू’ राज्यात चांगलेच ट्रेंडमध्ये आले आहेत. बापूंच्या या संवादातून रचलेल्या गाण्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त सांगोल्याला देश-विदेशात पोहोचवलं आहे.
काय म्हणाले होते अजित पवार
शहाजी बापू पाटील यांच्या 'काय झाडी, काय डोंगर' या डायलॉगचा उल्लेख करत अजित पवारांनी विधानसभेत जोरदार भाषण केलं. "ते शहाजी बापू तिथं काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल एकदम Ok Ok करत बसले", असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या विधानानंतर माध्यमांनी अधिवेशन संपल्यानंतर शहाजी बापूंशी संवाद साधला. त्यावर अजित पवारांनी मला खूप प्रेम दिलं. शरद पवारांनीही दिलं. त्यांच्यासोबत मी जीवनाचे ३५ वर्षे राजकारणात काम केलं.