सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदारदिलीप सोपल यांनीही राष्ट्रवादीला राम राम करत पवारांची साथ सोडली. आपल्या सोपल बंगला येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपण शिवसेना प्रवेश करत असल्याची घोषणा सोपल यांनी केली. त्यानुसार 28 ऑगस्ट रोजी सोपल यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. सोपल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर सोपलांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या 2 आठवड्यात मी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर, प्रवेशाचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. त्यानुसार मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार असून 28 तारखेला मुंबईत शिवसेना प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार दिलीप सोपल यांनी केली. आमदार सोपल यांची राजकीय जडणघडणच खासदार शरद पवार यांच्यासमवेत झाली. त्यामुळेच, सोपल यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतरही सोपल यांनी पवारांशी स्नेह कायम ठेवला होता. राष्ट्रवादीकडून सोपल यांना मंत्रीपदही देण्यात आलं होतं. तसेच, आघाडी सरकारच्या काळात पणन महामंडळाचे अध्यक्षपदही सोपल यांना मिळालं होतं. त्यामुळे सोपल राष्ट्रवादी सोडणार नाहीत, असे शरद पवारांसह, अजित पवारांनाही वाटत होते. मात्र, सोपल यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्वास फोल ठरल्याचे सिद्ध झाले आहे.
आ. सोपल यांचा शिवसेना प्रवेश भाजपमध्ये असणारे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासाठी अडचणींचा ठरणार आहे. युतीच्या जागावाटपात बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तर, राऊत यांनाही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मात्र, सोपल यांच्या प्रवेशामुळे ही जागा शिवसेनेला मिळेल, असं राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे. पण, तिकीट मिळालं तर भाजपाकडून, नाही मिळालं तर अपक्ष म्हणून आपण ही निवडणूक लढवणार असे, भाजपा नेते राजेंद्र राऊत यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीचं निश्चित झाल्यास बार्शी विधानसभा मतदारसंघात यंदा चांगल्याच राजकीय घडमोडी पाहायला मिळणार आहेत.