मोडनिंब : सोलापूर जिल्ह्यामध्ये व्यापार पेठा या शनिवार व रविवार दोन दिवस बंद ठेवा आणि जिल्ह्यातील आठवडे बाजार पूर्ववत करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष एकनाथ सुर्वे यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे केली आहे.
आठवडा बाजार बंद झाल्यामुळे जनावरांची खरेदी-विक्री बंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणखीन अडचणीत आला आहे. हा बाजार सुरू झाल्यास शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. चलन उपलब्ध होणार आहे. बाजार बंद असल्याने शेळ्या मेंढ्यांसह इतर जनावरे ही अतिशय कमी दराने विकली जात आहेत. छोट्या - छोट्या व्यावसायिकांचा बाजार बंद झाल्यामुळे त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला आहे. मात्र, बाजार बंद असल्याने हा भाजीपाला लहान - लहान शेतकऱ्यांनी विकायचा कुठे, हा प्रश्न पडला आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन दिवस व्यापारी पेठा बंद व व आठवडा बाजार सुरळीत चालू करावा, अशी मागणी सुर्वे यांनी केली आहे.
मोडनिंबच्या आठवडा बाजारात दर शनिवारी गाय, बैल, म्हैस व शेळ्या मेंढ्यांची दोन ते तीन कोटीपेक्षा जास्त उलाढाल होते. मात्र, बाजार बंद केल्यामुळे या सर्वांचे व्यवसाय बंद झाले आहेत. त्यांचाही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.