महूद- ग्रामपंचायत निकालानंतर दोन विरोधी पार्ट्यांतील सुमारे-२५० ते ३०० लोकांनी रस्त्यावर एकमेकांना मोठमोठ्याने बोलून अंगावर जाऊन गच्ची पकडून तसेच काठ्यांनी एकमेकांना मारहाण, भांडणे करून सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केला. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास लोटेवाडी, ता. सांगोला येथील मुख्य चौकात घडली.
पोलिसांनी याप्रकरणी माजी सरपंच उत्तम खांडेकर, ॲड. शंकर सरगर, किरण पाटील यांच्यासह १५० तर विरोधी बाजूच्या दादासाहेब लवटे, सागर लवटे, रघुनाथ ढेरे यांच्यासह १०० ते १५० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लोटेवाडी गावातील मुख्य चौकात दोन विरोधी पार्ट्यांतील अंदाजे अडीचशे ते तीनशे लोक समोरासमोर येऊन भांडण करण्याच्या तयारीत असल्याबद्दल ग्रामस्थ आबासाहेब पाटील यांनी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना फोनद्वारे कळविले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून हवालदार तानाजी लिंगडे, पोलीस बाबासाहेब पाटील, सचिन देशमुख, चार होमगार्ड तत्काळ लोटेवाडी चौकात पोहोचले. मात्र, पोलीस पाहून सर्वजण पळून गेले. याबाबत, पोलीस नाईक गणेश मेटकरी यांनी फिर्याद दाखल केली आहे.
----