टीव्हीवर बातम्या पाहत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं.. ती म्हणजे डेबिट, क्रे डिट कार्ड हॅक.. अचानक खात्यातून पैसे गायब.. याला कारण आपणच आहोत.. आज आपली माहिती सुरक्षित व गोपनीय राहिलीच नाही. आपण जिथे वावरतो त्या सोशल मीडिया साइट्स, बँकिंग साइट्स, ई-कॉमर्स साइट्स, सरकारी साइट्स, इतर अनंत साइट्स आणि लाखो अॅप्सना ही माहिती आपण कळत-नकळत, स्वखुशीनं-नाराजीनं दिलेली आहे किंवा देतो आहोत. यातली काही अॅप्स नव्या युगाची गरज म्हणून किंवा मनोरंजन म्हणून, तर काही अॅप्स वापरणं सरकारनं किंवा आपल्या बँक किंवा नोकरी देणाºया कंपनीनं वापरायला भाग पाडली आहेत म्हणून. अशा सर्व अॅप्समुळे आपली सर्व माहिती ओपन...
सदैव ‘कनेक्टेड’ असलेल्या आजच्या जगात आपली प्रायव्हसी उघड्यावर पडली आहे आणि तिची अनंत लक्तरं झाली आहेत. तुम्ही कुठल्या वस्तू खरेदी करता, हा डेटा अॅमेझॉनकडे आहे, तुम्ही कुठली औषधे घेता हा डेटा तुमच्या मेडिकलवाल्याकडे आहे. डिजिटल व मोबाईल इंटरनेट असल्यामुळे गुगल आणि फेसबुक किंवा अनेक फॉर्म भरताना आपली माहिती देतो म्हणजे डेटा.. आज प्रत्येक बँक खाते आधार कार्डला जोडले आहे व ते मोबाईलला जोडले आहे त्यामुळे आपली संपूर्ण माहिती (डेटा) एकमेकांस जोडली जात आहे. आधार नंबर जरी मिळाला तरी आपली माहिती गोपनीय राहत नाही.
कंपन्यांनी लोकांना इंटरनेट फक्त सेवा स्वरूपात देऊन पाचशे रुपयांच्या बिलात दोनशे रुपये नफा कमावण्यापेक्षा लोकांना पन्नास रुपयांत तेवढाच डेटा देऊन दीडशे रुपयांची झळ सोसली तरी त्यांच्या मोबाइलमधली व्यक्तिगत माहिती गोळा करून ती हजारो रुपयांना विकली तर एकूण होणारा फायदा हा हजारो रुपये असेल, असे गणित भारतातल्या उद्योजकांना लवकरच ध्यानात आले. पुढे लोकांची व्यक्तिगत माहिती डेटापेक्षा जास्त मौल्यवान असल्याने त्यांना अधिकाधिक डेटा पाण्याच्या भावात देऊन त्यांची माहिती गोळा केली जाते. आपल्या फोनमध्ये ही माहिती विस्तृत असते. तुमच्या हातातले हे अवघ्या काही ग्रॅम वजनाचे यंत्र माणसाच्या इतिहासातला अद्भुत चमत्कारच़ तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम फोन पाहता. त्यामुळे तुम्ही किती वाजता उठता हे तुमच्या फोनला ठाऊक आहे. आपल्यापैकी बरेच लोक सकाळी फोन टॉयलेटमध्ये घेऊन जातात.
फोनमध्ये ‘अॅक्सेलेरोमीटर’ नावाची एक छोटीशी चीप असते, ज्यामुळे फोन किती खाली किती वरती वा किती दूर गेला आहे याचे अंतर मोजता येते. त्यामुळे घरातले टॉयलेट पाश्चिमात्य आहे की भारतीय बनावटीचे हेही कळू शकते. हे एकदा कळले म्हणजे मग तुम्ही कुठले प्रॉडक्ट्स विकत घ्याल आणि कुठले नाही हेही ठरवता येते. तुम्ही कामासाठी किती वाजता घर सोडून बाहेर पडता हे फोनला माहिती आहे, तुम्ही किती वेगाने ड्राइव्ह करता आणि ज्या पद्धतीने ड्रायव्हिंग करता त्यावरून तुमच्याकडे कार आहे की बाइक. की मग तुम्ही रिक्षाने प्रवास करता हेही फोनला ठाऊक आहे. म्हणजे कंपन्यांना.. आपली ओळख म्हणजे इंटरनेटवर एक आयपी नंबर असतो, त्या नंबरला तुमचा फोन नंबर जोडलेला असतो. तुमचा फोन नंबर हा युनिक असतो आणि तोच तुमची इंटरनेटवरची ओळख असते. या क्रमांकाला तुम्ही जेव्हा तुमचे बँकेचे अकाऊंट जोडता तेव्हा तुमचा पैशाचा जमा-खर्च त्या क्रमांकाने संकलित होतो. हा नंबर जेव्हा तुम्ही तुमच्या मेंबरशिप कार्डला जोडता तेव्हा तुमची माहिती खात्यात संकलित होते.
भारत आज जगातील सर्वाधिक मोबाइल वापरकर्ते असलेला दुसºया क्रमांकाचा देश. भारतात जिओ युग आल्यापासून मोबाइल डेटा स्वस्त झाला़ अनेक कंपन्यांच्या वेबसाइट हॅकर्स हॅक करून माहिती चोरतात किंवा हजारो रुपये किंमत मोजून माहिती विकतात. आपली माहिती आपल्यालाच वाचून दाखवतात. त्यामुळे आपला विश्वास बसतो व आपण डेबिट, क्रेडिट, आधार नंबर, ओटीपी नंबर नकळत आपण त्यांना सांगतो आणि दुसºयाच सेकंदाला मोबाईलवर मेसेज येतो बँकेतून पैसे काढलेला आणि फोन कट.......प्रा. तात्यासाहेब काटकर,(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)