कुर्डूवाडी : कुर्डूवाडी - टेंभूर्णी रस्त्यावर ५ फेब्रुवारी रोजीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला छडा लावण्यात यश आले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने पळविलेला मोबाईल ही जप्त केला आहे.
५ फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या दरम्यान वैशाली परमेश्वर गाडे व त्यांचा मुलगा आकाश (दोघे रा.अंबाड, ता. माढा) हे दोघेजण अंबाड येथून निघाले होते. दोघे अनोळखी मोटारसायकलवरुन येऊन आकाश यास हा रस्ता कुठे जातो ? असा प्रश्न करीत त्याच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. यावेळी त्या दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत आकाश हा रस्त्यावर पडला आणि हाताला दुखापत झाली. त्यानंतर अनोळखी दोघेजण मोटारसायकलवरून पसार झाले. यानंतर वैशाली गाडे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली. मात्र, आरोपी फरार होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांचे पथक कुर्डूवाडीत गस्त घालत असताना या गुन्ह्यातील आरोपी हे कुर्डूवाडीत असल्याची माहिती मिळाली. कुर्डूवाडी येथे सापळा लावून संशयितास पकडून चौकशी केली असता त्याने कुर्डूतील गुन्ह्याची कबुली दिली. खाक्या दाखवताच त्याने आकाशच्या हातातून हिसकावलेला मोबाईल काढून दिला. हा मोबाईल कुर्डूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिला. अधिक तपास कुर्डूवाडी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले,धनराज गायकवाड,अक्षय दळवी,चालक समीर शेख यांनी यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला.
---
अधीक्षकांना प्रलंबित गुन्ह्याचा घेतला आढावा
दरम्यान पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात उघडकीस न आलेले गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांचा आढावा घेऊन या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्याकडून हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी हालचाली झाल्या.