आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे. या निमित्ताने सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी सर्वच परीक्षा केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईलला बंदी घालण्यात आली असून केंद्र परिसरातील दुकाने, शॉप बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत इयत्ता बारावीची व २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहरात परीक्षा केंद्राच्या १०० मिटर परिसरात २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६.३० फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ चे आदेश लागू करण्यात आले आहे.
या कालावधीत फौजदारी संहिता १०७३ चे कलम १४४ अन्वये सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्राभोवती १०० मीटर परिसरात असलेली झेरॉक्स केंद्र, फॅक्स, ई-मेल, इंटरनेट, मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्ट्रर यांचा वापर करण्यास बंदी आहे. संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे परीक्षेशी संबंधित कर्तव्य चोखपणे, कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावे असेही पोलिसांनी कळविले आहे.
परीक्षा केंद्रावर वाहनांना बंदी...
या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात शांततेला बाधा निर्माण होईल असे कृत्य करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनास प्रवेशास मनाई राहील. परीक्षेत संबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले मुख्याध्यापक, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, उमेदवार यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहणार आहे.
सदरचा आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी ,परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, अंमलदार यांना परीक्षेसंबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाही. परंतु भ्रमणध्वनीचा वापर केवळ केंद्र संचालक आणि दक्षता बैठक यांनाच करता येईल इतर सर्वांना भ्रमणध्वनी वापरास बंदी असेल.