संताजी शिंदे
सोलापूर : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत चालणारे न्यायालय आता सोलापुरात सुरू झाले आहे. पूर्वी पुणे येथे मोक्का न्यायालय चालत होते, मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हानिहाय मोक्का न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी, माळशिरस याठिकाणी एकूण सात न्यायालये चालणार आहेत. यासाठी एकूण अकरा सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची सुनावणी पुणे येथील मोक्का न्यायालयात होत होती. मागील महिन्यात महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हानिहाय मोक्का न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. सोलापुरातील न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ व २, बार्शी येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ व २, पंढरपूर येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ व २ तर माळशिरस येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ अशी एकूण सात मोक्का न्यायालये चालणार आहेत.
नियुक्त करण्यात आलेले वकील...मोक्का न्यायालयासाठी प्रमुख विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून सोलापूरसाठी अॅड. शैलजा क्यातम, अॅड. माधुरी देशपांडे, बार्शीसाठी अॅड. प्रदीप बोचरे, अॅड. दिनेश देशमुख, अॅड. श्याम झाल्टे, पंढरपूरसाठी अॅड. वांगीकर, अॅड. शांतीकुमार दुलंगे, अॅड. आनंद कुर्डूकर, माळशिरससाठी अॅड. संग्राम पाटील, अॅड. शांतिनाथ मेंढेगिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे येथे चालणारे ३० खटले सोलापूरच्या मोक्का न्यायालयाकडे वर्ग
जिल्ह्यातील मोक्का अंतर्गत सुमारे ३० खटले पुणे येथील मोक्का न्यायालयांमध्ये सुरू होते. सोलापुरात सात मोक्का न्यायालये सुरू झाल्यामुळे तेथील सुमारे तीस खटले वर्ग करण्यात आले आहेत. मोक्का लावायचा असेल तर संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून पोलीस महासंचालकांची परवानगी घ्यावी लागते.
पूर्वी पुणे येथे चालणारे मोक्का न्यायालय आता सोलापुरात आल्याने शहर व जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा बसेल. जिल्ह्यातील चार ठिकाणी एकूण सात न्यायालये चालणार आहेत. त्यामुळे मोक्का अंतर्गत खटल्यांना गती मिळेल. आरोपींवर कडक कारवाई होईल.- अॅड. प्रदीपसिंग राजपूतजिल्हा सरकारी वकील, सोलापूर.