मारुती वाघ मोडनिंब : जिद्द, चिकाटी, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शेतीत चांगले उत्पन्न मिळते़ कारण दोनवेळा डाळिंब बागेत अपयश आले; मात्र चिकाटी सोडली नाही़ तिसºयांदा प्रयत्न करून उत्कृष्ट फळ पिकविले़ ते पाहून तामिळनाडूचे व्यापारी हुरळून गेले आणि ९८ रुपये प्रतिकिलो या दराने जागेवरच खरेदी केली़ ही किमया साधली ती मोडनिंब येथील मुटकुळे बंधूंनी़ कारण त्यांच्या घामाला योग्य दाम मिळाल्याची परिसरात चर्चा आहे.
संतोष व दत्तात्रय या बंधूंनी तीन वर्षांपूर्वी भगव्या जातीच्या डाळिंब रोपांची निवड केली़ दोन एकर क्षेत्रामध्ये त्याची लागवड केली़ तत्पूर्वी त्यांनी जमिनीची नांगरट करून त्यात कुळवणी करून जमीन भुसभुशीत केली़ नंतर १२ बाय ८ अशा अंतरावर खड्डे खोदून भगवा जातीच्या डाळिंबाची रोपे लावली़ लागवड करताना त्यामध्ये लिंबोळी पेंड टाकून १०५० रोपांची लागवड केली़ पावसाचे प्रमाणही कमी आणि विहिरीला पाणी कमी असल्याने एक बोअर घेतला. त्याला पुरेसे पाणी लागले़ शिवाय विहिरीतील पाणी याचे काटेकोरपणे नियोजन केले़ ठिबक सिंचनद्वारे बागेला पाणी दिले.
दुसºयावर्षी पीक हाती आले; मात्र म्हणावा असा भाव न मिळाल्यामुळे त्याचे कमी उत्पन्न मिळाले, परंतु मुटकुळे बंधू निराश न होता डाळिंबाची तिसºया वर्षी चांगल्या पद्धतीची निगा राखली़ तसेच पुरेसे पाणी मिळावे म्हणून एक शेततळे घेतले़ त्यातून डाळिंबाला पाणी दिले़ पाण्याबरोबरच ५० टक्के जैविक व ५० टक्के रासायनिक खतांचा वापर केला़ त्यानंतर बहार धरला. त्यानंतर उन्हामुळे मालाची प्रतवारी कमी होऊ नये म्हणून जुने कपडे झाडावरून पांघरले़ सहा महिने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची जोपासना केली. त्यानंतर जेव्हा डाळिंब विक्रीसाठी सज्ज झाले तेव्हा ते आकर्षक दिसू लागले. यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रवीण माने यांचे मार्गदर्शन घेतले़ दरम्यान, तामिळनाडूमधील व्यापारी डाळिंब बाग पाहण्यासाठी आहे. डाळिंब पाहून त्यांनी जागेवरच प्रतिकिलो ९८ रुपयांप्रमाणे खरेदी केले. केवळ दोन एकरात २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले़ त्यामुळे आपल्या घामाला चांगला दाम मिळाल्याची भावना मुटकुळे बंधूंनी व्यक्त केली.
शेती ही फायद्याचीच ठरते हा विश्वास- आम्ही दोघे भाऊ व आमचे कुटुंब शेतामध्ये अतिशय मन लावून कष्ट करतो़ त्यामुळे शेतातील सर्व गोष्टीकडे बारीक लक्ष असते़ जिद्द, कष्टाने आणि वेळच्या वेळी आवश्यक ती खते, पाणी दिल्यास शेती ही नुकसानीत नव्हे तर फायद्याचीच ठरते हा विश्वास आम्ही संपादन केला, असे मुटकुळे बंधूंनी सांगितले.