टेंभुर्णी : ग्रामपंचायतीच्या अतिशय चुरशीच्या वाटणाऱ्या वार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मोडनिंब शहर विकास आघाडीने सत्ता राखून ठेवली आहे. १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवला आहे. अतिशय शांततेत मतदान आणि मतमोजणी प्रक्रीया पार पडली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी व माजी सरपंच बाबुराव सुर्वे यांच्या मोडनिंब शहर विकास आघाडी पॅनलचे १७ पैकी ११ उमेदवार विजयी झाले. प्रभाग एक मधून कल्याणी तोडकरी विजयी झाल्या. प्रभाग दोन मधून कैलास तोडकरी, सदाशिव पाटोळे, शितल मस्के तर प्रभाग चार मधून ज्योत्स्ना गाडे व अमित कोळी विजयी झाले. प्रभाग पाच मधून दत्तात्रय सुर्वे, सोमनाथ माळी, लक्ष्मी पाटील आणि प्रभाग सहा मधून प्रमिला खडके आणि मीना शिंदे असे ११ उमेदवार विजयी झाले. विरोधी शिवाजी सुर्वे गटाचे प्रभाग एक मधून अमर ओहोळ आणि योगिता शिंदे विजयी झाले. प्रभाग तीन मधून सर्वपक्षीय लोकशाही आघाडीचे प्रतापसिंह पाटील, सुनिता राजेश पाटील विजयी झाले. याच आघाडीचे अरुण गिड्डे हे प्रभाग सहा मधून विजयी झाले. प्रभाग चार मधून अनिल सावंत गटाच्या सीता सावंत विजयी झाल्या. या निवडणुकीत एकूण ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अनेक दिग्गजांना पराभवास सामोरे जावे लागले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण माजी सभापती नंदाताई सुर्वे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे आणि आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव नागनाथ ओहोळ, भाजप शहराध्यक्ष धनाजी लादे यांच्या पत्नी धनश्री लादे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गिड्डे यांच्या पत्नी सुनंदा गिड्डे यांना पराभवास सामोरे जावे लागले.