मनसेच्या वतीने मोडनिंब व करकंबमधील शासकीय अन्नधान्याचे बंद केलेले गोडाउन पुन्हा सुरू करा म्हणत कुर्डूवाडीतील शासकीय गोडाउनला कुलूप लावून केले आंदोलन
लक्ष्मण कांबळे
कुर्डूवाडी : मोडनिंब (ता. माढा) व करकंब (ता. पंढरपूर) येथील शासकीय धान्याचे गोडाउन पुरवठा विभागाने अचानक बंद करून तेथील स्वस्त धान्य दुकाने कुर्डूवाडी येथील शासकीय गोडाउनला जोडली आहेत. त्यामुळे मोडनिंब व करकंब परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त धान्य वेळेवर मिळेनासे झाले आहे. यामुळे मोडनिंब येथील शासकीय गोडाउन पुन्हा पूर्ववत करावे यासाठी मनसेच्या वतीने गुरुवारी सकाळी ११.३० वाजता कुर्डूवाडीतील शासकीय गोडाउनला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. या मागणीसाठी राज्याचे अन्नधान्य मंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना याअगोदर निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याचा काहीही उपयोग न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी कुर्डूवाडी गोडाउन किपर यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष खटके,आकाश लांडे, अमोल घोडके, बाळासाहेब टोणपे, सागर लोकरे, सागर बदपट्टे, ओंकार चौधरी, गणेश चौधरी, युवराज कोळी, सोमनाथ पवार, संजय वाघमोडे, बळी शिंदे, नवनाथ व्यवहारे, अक्षय सलगर, महादेव मांढरे, विकास जाधव, विकी ओहोळ व गणेश मुसळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
फोटो ओळ- ०४कुर्डूवाडी-आंदोलन
मोडनिंब व करकंब येथील शासकीय अन्नधान्य गोडाउन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली कुर्डूवाडीत रॅली काढत येथील गोडउनला कुलूप लावून आंदोलन केले.
----