समीर इनामदारसोलापूर : लग्नानंतर काही वर्षांतच पतीचे झालेले निधन... मुलगा केवळ एक वर्षाचा.... अशा वेळी खचून न जाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचे पालन करीत मुलाचे संगोपन करून त्याला तहसीलदार करणाºया मंगळवेढ्याच्या लता सुरेश शिकतोडे यांची जिद्द, संघर्ष नवदुर्गेचा अवतारच आहे.
पती सुरेश शिकतोडे यांच्यासोबत मुंबईला गोदीमध्ये कामाला गेलेल्या लता यांना आयुष्याने खूप झटके दिले. १९९२ साली पतीचे निधन झाल्यानंतर त्या एक वर्षाच्या मुलासह परत मंगळवेढ्याला आल्या. कमी वयात आलेले वैधव्य पाहून अनेकांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. मुलगा बहिणीला दत्तक द्यावा आणि लग्न करून नव्याने संसार थाटावा अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा धुडकावत त्यांनी आपल्या मुलासह राहून पुढील आयुष्य जगण्याची भूमिका घेतली. प्रसंगी तडजोड नको म्हणून स्वत:चे पत्र्याचे घर बांधून आयुष्य जगायला सुरूवात केली. त्यावेळी लता यांचे वडील, आई, भाऊ आणि सर्वच नातेवाईक मंगळवेढा नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करीत होते, लता यांनीही रोजंदारीवर काम करण्याचा निर्णय घेतला. १९९४-९५ साली पाच ते दहा रूपये पगारावर काम करण्यास सुरूवात केली.
‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या बाबासाहेबांच्या मंत्रावर चालून आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे हा ध्यास घेतला आणि शाळेत घातले. मुलगा हुशार असला तरी नववीत असताना त्याला गणितात शून्य गुण मिळाले. लता यांनाही वाटले आपला मुलगा शिकू शकत नाही. त्यामुळे त्यांनी अगोदरच सफाई कंत्राटदाराला कामासाठी सांगून ठेवले होते. पुढे मुलाने अभ्यास करून दहावीत तिसरा क्रमांक मिळविला. बारावी केली आणि डी़एड़ही केले. मंगळवेढा ते सांगोला पास होता. पुढे कमलापूरला जाण्यासाठी पाच रुपये नसायचे. यासाठी २० टक्के व्याजाने लता यांनी पैसे काढून मुलाला जाण्याचा त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर एमपीएससी करताना त्रास होऊ नये म्हणून पै न पै साठवित दोन लाख रुपये जमा करून ठेवले. पुण्यात अभ्यास करताना हे पैसे कामी आले. मुलगा तहसीलदार झाला.
आताही त्या थांबत नाहीत. अजूनही त्या ३०० रुपये पगारावर नगरपालिकेत कामाला जातात. ज्या नोकरीने आपल्या मुलाचे आयुष्य वाढविले ती नोकरी कशी सोडायची हा त्यांना वाटणारा प्रश्न आहे.
- कोणत्याही आईचे आपल्या मुलाला मोठे करावयाचे स्वप्न असते. मात्र ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेतलेले काबाडकष्ट आणि त्यासाठीची तयारी ती करीत असते. यादरम्यान येणाºया अडचणींवर मात करताना ती कोणत्याही गोष्टींची तमा बाळगत नाही. आपला मुलगा तहसीलदार व्हावा म्हणून मंगळवेढा येथील सफाई कामगार लता शिकतोडे यांची ही कहाणी.