संतोष आचलारे सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची ठरलेली मोदी अन् गांधी ही नावं सोलापुरात मात्र वादग्रस्त बनली आहेत. निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या दालनासमोरच ३२ वर्षांपूर्वी लावलेली कोनशिला मोदी नामक अधिकाºयामुळे काँग्रेससाठी आक्षेपार्ह ठरली असतानाच गांधी नामक झोपडपट्टीही भाजपाच्या नजरेत आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय पक्षाशी निगडित असलेले सर्वप्रकारचे फ्लेक्स मागील दोन दिवसांत काढण्यात आले आहेत. मात्र जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दालनासमोरच असलेल्या कोनशिलेवर मोदी यांचे तर सिव्हिल परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर राहुल गांधी यांचे नाव झळकत असल्याचे दिसून येत आहे.
ऐन निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसविरुद्ध भाजपा असा सामना रंगत असताना ‘मोदी आणि गांधीं’ची नावे वेगळ्या प्रकारे चर्चेत अहेत.लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर रविवार व सोमवार या दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध ठिकाणी असलेल्या कोनशिलांवर पडदा टाकण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांच्या दालनासमोरच नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाची कोनशिला मात्र तशीच राहिली आहे.
पुणे विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त चंद्रशेखर मोदी यांच्या हस्ते १ जुलै १९८७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाल्याची माहिती या कोनशिलेवर दिसून येत आहे. या कोनशिलेवर कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींची नावे नसल्याने ही कोनशिला झाकण्यात आली नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. मात्र यात मोदी हे आडनाव असल्याने ही कोनशिला चर्चेचा विषय ठरला आहे.
मोदी पोलीस चौकीवर असलेले मोदी नाव तर याच परिसरात असलेल्या अनेक फलकांवर मोदी असा उल्लेख दिसून येत असल्याने हा विषयही निवडणुकीच्या काळात चांगलाच चर्चेत आला आहे.
सोलापूर सिव्हिलच्या बाजूला असलेल्या भाजपा कार्यालयासमोरच राहुल गांधी नगर वसाहत आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अनेक फलकांवर राहुल गांधी यांचे नाव झळकत आहे. त्यामुळे येथील नावही चर्चेचा विषय ठरला आहे. या परिसरात सामाजिक संस्था, शाळा व अन्य खासगी दुकानांसमोर सर्रास राहुल गांधी असे लिहिलेले दिसून येते.
मोदींचा उल्लेख असणारे फलक हटवा : प्रकाश वाले- जिल्हाधिकारी कार्यालयात, मोदी परिसरात व पेट्रोलपंप परिसरात मोदी यांच्या नावाने असलेले फलक अजूनही दिसून येत आहेत. हा आचारसंहितेचा भंग ठरणाराच विषय होणार आहे. त्यामुळे मोदी यांच्या नावाने असलेले फलक त्वरित काढण्यात यावेत, अशी मागणी असणार असल्याचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली आहे.
गुन्हा कोणावर दाखल करणार हा प्रश्न : अशोक निंबर्गी- भाजपा पक्षकार्यालयासमोर राहुल गांधी यांचा उल्लेख असलेले फलक दिसून येतात. मात्र या फलकावर कोणतेही निवडणूक चिन्ह दिसून येत नाही. त्यामुळे हा विषय आचारसंहितेचा फारसा भंग करणारा ठरत नाही. या विषयावर गुन्हा दाखल करायचे झाले तर तो कोणावर करायचा असाही प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली.