रोजगार, महागाई, विकास, धोरणे सर्वच क्षेत्रात मोदी सरकार अपयशी ठरली आहे, हे जनतेला दाखवून द्या, असं आवाहन काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर लोकसभा निवडणुक पूर्वतयारीसाठी आढावा बैठक अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.
थोड्याच दिवसात निवडणुका लागणार आहेत खोटे आश्वासने देणारे पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहेत पण त्यांना व युवकांना, जनतेला या अगोदर दिलेले आश्वासनाची आठवण करून द्या, असं आवाहन प्रणिती शिंदेंनी केलं. तसेच सोलापुरचा विस्कळीत पाणी पुरवठा, महापालिकेतिल भोंगळ कारभार आदिमुळे लोक काँग्रेसकडे आशेने बघत आहे, असंही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या.
२०१४पर्यंत अगोदर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या जोरावर अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. आगामी निवडणुकीत युवकांवर मोठी जबाबदारी असून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नव्या उत्साहाने काम करत नवीन मतदार नोंदणी करून त्यांना समजावून सांगून बूथ यंत्रणा सक्षम करा. तरच आगामी निवडणुकीत आपण सक्षमपणे निवडणुकीच्या सामोरे जाऊ शकतो, असेही प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, मी आता सक्रिय राजकारणातून निवृत्त झालोय. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे उमेदवार असतील अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. २०१९ च्या निवडणुकीत शिंदे यांचा भाजपचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभव केला होता. शिवाचार्य हे सोलापूरचे खासदार आहेत. या पराभवापूर्वीच शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हटले होते. वंचितकडून प्रकाश आंबेडकर हे देखील उभे होते, यामुळे शिंदे यांना विजय मिळविता आला नव्हता.