मोदींनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवले : राहुल गांधी
By राकेश कदम | Published: April 24, 2024 06:20 PM2024-04-24T18:20:41+5:302024-04-24T18:20:58+5:30
शेतकऱ्यांची कर्जमाफी, युवकांना नोकऱ्या मिळतील, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सोलापुरात दिले.
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवून ठेवले. काँग्रेसचे सरकार येताच हा अन्याय दूर होईल. शेतकऱ्यांची कर्जमाफी, युवकांना नोकऱ्या मिळतील, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सोलापुरात दिले.
महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि माढ्यातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सोलापुरात जाहीर सभा झाली. राहुल गांधी म्हणाले, मोदींनी दिवसातील 22 मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ केली. यूपीए सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. मोदींनी उद्योगपतींची जेवढी कर्जमाफी केली तेवढा पैशातून शेतकऱ्यांची किमान 50 वेळा कर्जमाफी झाली असती. पण मोदींचे लक्ष केवळ त्यांच्या उद्योगपती मित्रांकडे आहे. भाजप आणि मोदींच्या हातातून आता निवडणूक सुटली आहे. त्यामुळे ते आता घाबरले आहेत. त्यांनी जाहीर सभांमधून खोटे भरायला सुरुवात केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते.