राकेश कदम
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारी रोजी शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. या दौºयात पंतप्रधानांच्या हस्ते शहरातील बहुचर्चित उर्दू घरच्या कामाचे भूमिपूजनही व्हावे. हा कार्यक्रम झाल्यास संबंधित समाज घटकाचा आपल्याबद्दलचा गैरसमज दूर होण्यास मदत होईल, अशा आशयाचे पत्र भाजपा नेत्या तथा महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
मोदींच्या या दौºयात शहर भाजपातील काही नेत्यांनी घेतलेली ही ‘सेक्युलर’ भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ७० मिनिटांच्या सोलापूर दौºयात महापालिकेची चार प्रमुख विकासकामे आणि रे नगर येथील ३० हजार घरकुलांच्या पायाभरणीचा शुभारंभ करणार आहेत. रे नगर येथील प्रकल्प हा भाजपाचे कट्टर विरोधक मानल्या जाणाºया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या पुढाकारातून आकाराला आला. या प्रकल्पाला निधी मंजूर करण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तयारी माकप नेत्यांनी दाखविली होती. त्यानुसार हा कार्यक्रमही होत आहे. आता शहर भाजप नेत्यांनी उर्दू घरच्या कामाचा मुद्दाही पुढे केला आहे.
महापौर बनशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, शहरातील सिव्हिल हॉस्पिटलसमोरील जागेत (सर्व्हे नं ६१७५) उर्दू घरचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने या कामाला निधी दिला नाही. पण त्याचे भूमिपूजन केले. आपण आणि आपल्या सरकारने या कामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन-चार दिवसांत वर्क आॅर्डर देण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
ज्या जागेवर उर्दू घरचे बांधकाम होणार आहे ती जागा महाराष्ट्र शासनाची आहे. या कामाच्या उद्घाटनाचा समावेश आपल्या ९ जानेवारी रोजीच्या दौºयात व्हावा. तसे आदेश आपण जिल्हाधिकाºयांना द्यावेत. उर्दू घरच्या कामाचे भूमिपूजन या कार्यक्रमात झाल्यास आपला पक्ष संबंधित समाज घटकाविरोधात नाही ही भावना जनसामान्यांमध्ये रुजण्यास मदत होईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
उर्दू घरची वाटचाल
- - राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने उर्दू भाषेचे संवर्धन करण्यासाठी सोलापुरात उर्दू घर बांधण्यास मंजुरी दिली होती. या कामाच्या जागेवरुन सुरुवातीला वाद झाले. हे वाद शमल्यानंतर या कामाच्या आराखड्यात बदल करण्यात आले. सरकारने या कामासाठी सहा कोटी रुपये मंजूर केले. पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू होण्यास विलंब लावण्यात आला. त्यामुळे शहरातील उर्दूप्रेमींनी आंदोलन सुरू केले.
- - जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची बैठक घेऊन अडथळ्यांची शर्यत दूर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली. सध्या या जागेवर महापालिकेचे साहित्य पडलेले आहे. ते हटविण्यात यावे. आम्ही तातडीने काम सुरू करतो, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी नगर अभियंता संदीप कारंजे यांना १५ डिसेंबर रोजी पाठविले आहे.