सोलापूर : काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर जनतेचा राग खदखदत होता़ काँग्रेसला पूर्णत: नाकारायचं होतं, अशावेळी केवळ मोदी लाट होती़ मात्र विधानसभा निवडणुकीत मोदी लाट चालणार नाही़ राज ठाकरेंवर जनतेचा विश्वास आहे, आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढू, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधिमंडळातील गटनेते आ़ बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता़ गुरुवार, २९ मे रोजी आ़ नांदगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कनगरा गावाला भेट दिली़ त्यानंतर ते सोलापुरात काही वेळ थांबले होते़ यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वरील विश्वास व्यक्त केला़ यावेळी उद्योजक युवराज चुंबळकर, जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष भूषण महिंद्रकर उपस्थित होते़ यापूर्वी शिवसेनेत असताना सोलापूर जिल्ह्याचा संपर्कप्रमुख असताना जिल्ह्यातून सेनेचे चार आमदार विधानसभेवर निवडून आणल्याची आठवण करुन देत यंदाही याची पुनरावृत्ती होईल, भाजपाने या निवडणुकीत मोदी लाटेचं स्वप्न रंगवू नये, असा टोला नांदगावकर यांनी लगावला़ लोकसभा निवडणुकीतील अपयशाबाबत बोलताना ते म्हणाले की, मनसे हा एकमेव पक्ष स्वतंत्र विचारधारेवर तर इतर पक्ष हे युतीबरोबर निवडणूक लढवित होते़ लोकांना यंदा काँग्रेसला पूर्णत: नाकारायचं होतं, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं होतं़ मात्र ३१ मे रोजी राज ठाकरे हे विधानसभेच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडणार असल्याचेही नांदगावकर म्हणाले़
विधानसभेला मोदी लाट चालणार नाही
By admin | Published: May 30, 2014 12:53 AM