आपला महाराष्ट्र अनेक उद्योग-धंद्यांनी समृद्ध असला तरी कापड व्यवसाय हा खरा बेस. आजही मुंबईतल्या कैक चाळी गिरणगावाच्या सुवर्णकाळ आठवत तग धरून याच मुंबईची छोटी भावंडं ठरली. सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव अन् भिवंडीसारखी शहरं मात्र स्पर्धेच्या युगात स्वत:ला झपाट्यानं बदलून घेता न आल्यानं इथला व्यवसाय हळूहळू मागं पडला. मात्र, याच सोलापूरची नवी पिढी आता आपल्या उत्पादनाचं ग्लोबल मार्केटिंग करण्यात आक्रमकतेनं पुढाकार घेऊ लागलीय.
गेल्या आठवड्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचे पती निक जोन्स यांनी सोलापुरी चादरीपासून शिवलेला शर्ट परिधान केला. त्याचा फोटोही ‘इन्स्टा’वर टाकला. पाहता-पाहता व्हायरल झाला. चादर ही केवळ थंडीत ऊब आणणारी वस्तू. मात्र, त्याचा फॅशन म्हणूनही वापर करता येतो याचा शोध निकच्या पोस्टमधून नेटकऱ्यांना लागला. त्यामुळं चित्रविचित्र कॉमेंट्सचाही पाऊस पडला. कुणी त्याला बेडशीट म्हणलं तर कुणी ब्लँकेट. मात्र, पंधरा वर्षांपूर्वी सोलापूरच्या राजू राठी नामक व्यापाऱ्यानं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये याच चादरींचा पुरेपूर वापर केला होता. यातल्या कैक तरुणींनी जॉन परेरांच्या माध्यमातून चादरीचे वेगवेगळे ड्रेसही वापरले होते. त्यावेळी डाव्या चळवळीतील नेत्यांनी ‘चादरीची बदनामी करणारी विकृती’ या भाषेत कडाडून टीकाही केली होती.
‘चादरीचा ड्रेस कुठं वापरतात का ?’ असा सवाल जगाला पडला असला तरी या ब्रँडिंगचा पुरेपूर वापर करण्यावर या क्षेत्रातल्या नव्या पिढीनं भर दिलाय. १९९० च्या दशकात सोलापूरची चादर देशभरात जायची. समुद्रकिनारी वापरले जाणारे ‘बीच टॉवेल’ तर कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया अन् सौदी अरेबियातही हातोहात खपले जायचे. त्याकाळी जगभरातून वाढलेली मागणी पाहून इथल्या अनेक उत्पादक व्यापाऱ्यांनी दुबईतच बंगला विकत घेऊन तिथं व्यवसाय सुरू केला होता.
मात्र, कमी दरात जास्त माल खपविण्याच्या नादात काही जणांनी सुताच्या क्वॉलिटीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं अन् इथंच मोठा फटका बसला. याच काळात पानिपत, सेलम अन् मदुराईत सेम टू सेम सोलापुरी चादरीचा डुप्लिकेट माल तयार होऊ लागला. स्वस्तात मिळणारी ही बनावट चादर ‘सोलापुरी ब्रँड’ म्हणून हातोहात खपली जाऊ लागली. एकेकाळी ज्या सोलापुरात बत्तीस हजार पॉवरलूम मशीन्सवर लाखभर कामगार काम करायचे, तिथं आता केवळ चौदा यंत्रांवर केवळ पस्तीस हजार कामगार कसंबसं जगताहेत.
एकीकडं देशात बनावट मालाचं उत्पादन वाढलंय, दुसरीकडं पाकिस्तान, तुर्किस्तान अन् उझबेकिस्तानसारखे देशही चादरींच्या निर्मितीत उतरलेत. त्यामुळं सोलापूरच्या हुशार उद्योजकांनी आता नवनव्या उत्पादनांकडं लक्ष वळविलंय. बाथरोब, बेसिन नॅपकिन, रोटी कव्हर, टॉवेल बुके अन् वॉल हँगिंग यांचं डिजिटल मार्केटिंग यांनी सुरू केलंय. चॉकलेट ही केवळ स्वत: खाण्याची वस्तू नसून दिवाळी गिफ्ट म्हणूनही देता येते, हा वेगळा ट्रेंड जसा आणला गेला, तसाच नवा प्रयोग वॉल हँगिंगमध्ये केला जातोय. राजकीय नेत्याच्या वाढदिनी असे हँगिंग देण्याची क्रेझ आता कार्यकर्त्यांमध्ये आलीय.
‘इंडियन नेव्ही’ला जवळपास तीन-साडेतीन लाख ब्ल्यू टॉवेल्स पुरविणाऱ्या सोलापूरनं निक जोन्सच्या या अनोख्या फॅशन प्रेझेंटेशनमधली संधी अचूक ओळखलीय; म्हणूनच ‘मोदी जॅकेट’च्या धर्तीवर ‘चादर जॅकेट’ची निर्मिती सुरू केलीय. त्यामुळं लवकरच गल्लोगल्ली ‘निक जोन्स’ वावरताना दिसू लागले तर आश्चर्य वाटायला नको.