मोहोळ : मोहोळ शहरातील देशसेवेसाठी लढणाºया आजी-माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींच्या घरावर आकारला जाणारा कर (घरपट्टी) नगरपरिषदेने माफ करण्यासाठी माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सीमाताई पाटील यांनी वर्षभर पाठपुरावा केला होता. अखेर याची अंमलबजावणी झाली असून, यापुढे आजी-माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींच्या घराचा मालमत्ता कर माफ होणार आहे.
या निर्णयाला सभागृहातील नगरसेवकांनी बहुमताने पाठिंबा दर्शविला आहे. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी या निर्णयावर शासन निर्णयाला अधीन राहून कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. लाभार्थ्यांनी आपली योग्य ती कागदपत्रे मोहोळ नगरपालिकेमध्ये जमा करावीत व नियम व अटींना अधीन राहून शहरातील सर्व सैनिक कुटुंबांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सीमा पाटील यांनी केले आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सैनिकांच्या घरांना कर माफ करण्यासाठी सरपंच व पदाधिकाºयांना विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.