सोलापूर : माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यास सोलापुरातून केवळ दोघांनी पक्षत्याग केल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर संस्थांमधील घोटाळा लपविण्यासाठीच मोहिते-पाटलांनी राष्टÑवादी सोडून भाजपात प्रवेश केल्याचा आरोप राष्टÑवादीचे प्रवक्ते मनोहर सपाटे यांनी केला.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम दिसून येत आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह यांनी बुधवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केल्यावर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघडपणे चुळबूळ सुरू झाली आहे. याबाबत पदाधिकाºयांची मते जाणून घेतली.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदांचा अद्याप कोणी राजीनामा दिलेला नाही किंवा इतर पक्षात जाण्याबाबत कोणीही कळविलेले नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व अजितदादा पवार यांचेच आपण निष्ठावंत असल्याचे माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, महापालिकेतील गटनेते किसन जाधव, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव सायरा शेख यांनी म्हटले आहे.
शहरातून माजी महापौर प्रवीण डोंगरे व किरण पवार हे दोघे भाजपमध्ये गेल्याचे समजले असल्याचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. अकलूजच्या बैठकीदरम्यानच शहरातील पदाधिकाºयांची बैठक झाली. मात्र पक्षाच्या बैठकीला अल्पसंख्याक सेलचे राजू कुरेशी, फारुक मटके उपस्थित नव्हते.
झेडपीच्या राजकारणावर परिणाम- जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे तर भाजप सदस्याच्या पाठिंब्यावर सध्याचे पदाधिकारी मंडळ अस्तित्वात आहे. पण याचा भाजपला काहीच उपयोग नसल्याची तक्रार आहे. खुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत विचार करावा लागेल असा इशारा दिला होता. आता मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात झेडपीचे सूत्रधार बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्टÑवादीकडून निवडणूक लढविल्यास अडचण वाढणार आहे.
शहराच्या राजकारणात मोहिते-पाटील गट म्हणून काम केले आहे. त्यामुळे रणजितसिंह यांच्याबरोबर राष्ट्रवादी पक्षाला रामराम केला असून शहराध्यक्षाला कल्पना दिली आहे. माझ्याबरोबर राजा शेख, शफी इनामदार, राजू सुपाते उपस्थित होते.- प्रवीण डोंगरे, माजी उपमहापौर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा ऐकावयास मिळत आहेत. मी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करीत आहे. सोलापूर लोकसभेचे आघाडीचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची ३० वर्षांत प्रथमच भेट घेतली.- विष्णू निकंबे, माजी उपमहापौर