अकलूज : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत धवलसिंह मोहिते-पाटील, पद्मजादेवी मोहिते-पाटील व इतर पाच जणांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या तक्रारीवरून अकलूज पोलीस ठाण्यात ५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला़ त्यानंतर पोलीस नाईक सरडे हे तपास करून माळशिरस न्यायालयात चार्जशीट दाखल करतील. त्यामुळे आता मोहिते-पाटील भाऊबंदकीतील राजकीय वाद आता न्यायालयात जाणार आहे.
सदाशिवनगर येथील श्री. शंकर सहकारी कारखाना संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया २५ नोव्हेंबर २०१८ रोजी पार पडली. दरम्यान, प्रचार समाप्ती २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत असताना धवलसिंह मोहिते-पाटील, पद्मजादेवी मोहिते-पाटील, सुदर्शन मिसाळ, माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब शिंदे, अण्णासाहेब इनामदार, सोमनाथ वाघमोडे या ७ जणांनी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान वाघोली येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना व बेकायदेशीर स्पीकर लावून सभेत प्रचार केला.
याबाबत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून अकलूज पोलीस ठाण्यात ५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस नाईक सरडे हे तपास करून माळशिरस न्यायालयात चार्जशीट दाखल करतील. त्यामुळे आता मोहिते-पाटील भाऊबंदकीतील राजकीय वाद न्यायालयात रंगणार आहे.