मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखेभावा-बहिणीच्या नातेसंबधांला जपणारा, त्यांचे नाते दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून राखी बांधते. आणि भाऊ बहिणीला तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. आज राखीपोर्णिमा हा सण सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.
कोरोनामुळे गेले दोन वर्षे कोणतेही सण उत्सव साजरे करता आले नाहीत, त्यामुळे या वर्षी बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा रक्षाबंधन सणासाठी भाऊ आवर्जून राखी बांधण्यासाठी मोटारसायकल, चार चाकी, एसटी बस नी जात आहेत. श्रावण पौर्णिमेला गुरुवार, ११ ऑगस्ट २०२२ रोजी रक्षाबंधन साजरे केले जात आहे, तर काही जण १२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे करतील.
काही ठिकाणी चिमुकल्यांनी राखी बांधली त्यांना चॉकलेट स्वरूपात भेटवस्तूही दिल्या. बहीणीने भावाला ओवाळून त्यांचा हातावर राखी बांधली आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त केले. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे हा होय. राखी पौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी बस स्थानक गजबजलेले आहे. सणाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.