सोलापूर : परराज्यातून अवैधरीत्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या देशी-विदेशी दारूचा साठा टेम्पो व एका जीपमध्ये भरताना मोहोळ पोलिसांनी धाड टाकून पकडला. १३ लाख १४ हजारांच्या दारूसह २६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल मोहोळ पोलिसांच्या पथकाने जप्त केला.
४ डिसेंबर रोजी रात्री पाटकूल-टाकळी सिकंदर रोडवर एका शेतात पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप परमेश्वर पवार (रा. तांबोळे, ता. मोहोळ) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार, परराज्यातून विनापरवाना देशी-विदेशी दारू घेऊन पाटकूल परिसरात एक टेम्पो (एमएच ४५-१५०५) मध्ये आणि एका जीप (एमएच १३-३५०३) मध्ये भरत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवीराज कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल घोळवे, प्रवीण साठे, सिद्धनाथ मोरे, बालाजी गायकवाड, अजित मिसाळ, स्वप्नील कुबेर, संदीप सावंत यांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून देशी-विदेशी दारूचे ४४१ बॉक्स जप्त केले. या कारवाईत १३ लाख १४ हजार १२० रुपयांची ही दारू असून, दोन्ही वाहनांसह २६ लाख १४ हजारांचा मुद्दे माल पोलिस पथकाने ताब्यात घेतला आहे.
याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रवीराज कांबळे करीत आहेत.