राजकुमार सारोळे
सोलापूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यात मोहोळ व सांगोला मतदारसंघात महिला मतदारसंघाची टक्केवारी कमी आढळल्याने विशेष अभियान राबविण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत.
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ३१ आॅगस्टला मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. यात १७ लाख ९० हजार ८९0 पुरुष तर १६ लाख ३० हजार ३४५ महिला आणि तृतीयपंथी ८९ असे एकूण ३४ लाख २१ हजार ३२४ मतदार आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महिला मतदार नोंदणीचे प्रमाण काही तालुक्यात कमी असल्याचे आढळून आले आहे.
यामध्ये मोहोळ: ६८.९५, सांगोला: ६७.८८ असे महिला मतदारांचे प्रमाण आहे. सांगोला तालुक्यात दरहजारी पुरुष ९0६ तर महिला ८८२ आणि मोहोळ तालुक्यात पुरुष ९0७ तर महिलांचे ८८२ असे प्रमाण आहे. याउलट करमाळा मतदारसंघात हे प्रमाण समसमान आहे तर बार्शी, पंढरपूर व शहर मध्यमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे इतर विधानसभा मतदारसंघात महिला मतदार नोंदणी कमी का झाली याची कारणे शोधून नवीन मतदार नोंदणी ४ आॅक्टोबर करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मतदार जनजागृती अभियानात या तालुक्यांना जादा लक्ष द्यावे अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत. या मतदारसंघात महिला मतदार नोंदणीसाठी खास कार्यक्रम घ्यावेत असे कळविले असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी सांगितले.
मतदार जनजागृती समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्हा परिषदेत मतदार जनजागृतीची शपथ घेण्यात आली. शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. वालचंद कॉलेज, एसईएस ज्युनिअर कॉलेज, भारती विद्यापीठ, पंढरपूर येथे झालेल्या सुधारित आराखड्याच्या मूल्यमापन प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या शिक्षकांना शपथ देण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव, वागदरी, नागणसूर, मैंदर्गी, पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी, पांढरेवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप, अकलूज येथील जिल्हा परिषद शाळांनी प्रभातफेरी काढली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी सर्व ग्रामपंचायतींना दोन आॅक्टोबर रोजी होणाºया ग्रामसभेत मतदार जनजागृतीचा विषय अजेंड्यावर घेऊन उपस्थित ग्रामस्थांना शपथ देण्याविषयी सूचित केले आहे.
असे आहे दरहजारी महिला मतदारांचे प्रमाण
तालुका पुरुष (टक्के) महिला
- करमाळा ७२.७९ ७२.३७
- माढा ७३.२५ ६९.५९
- बार्शी ७0.४६ ७२.२८
- मोहोळ ७0.९४ ६८.९५
- शहर उत्तर ७३.६४ ७२.४0
- शहर मध्य ७५.२0 ७६.0१
- अक्कलकोट ७६.११ ७४.१0
- दक्षिण सोलापूर ७७.२८ ७३.४८
- पंढरपूर ६९.३७ ७७.५0
- सांगोला ६९.६९ ६७.८८
- माळशिरस ७१.८६ ६९.४२
- एकूण ७२.७0 ७२.१४