मोहोळ येथील रहिवासी असलेला मनोज धोत्रे हा पायाने दिव्यांग आहे. त्याचे वय ३८ वर्षे असून त्याला लहानपणी पोलिओ आजाराने ग्रासले होते. यामध्ये त्याचा पाय निकामी झाला होता. मात्र मोठ्या धैर्याने त्याने आपल्या व्यंगावर मात करीत आपले क्रिकेटमधील कौशल्य सिद्ध करून दाखवले आहे. त्याचे शिक्षण डी.एड्.पर्यंत झाले असून क्रिकेटच्या आवडीसाठी त्याने पुढील शिक्षणाला रामराम ठोकला. बॉल बॉय म्हणून सुरुवात केलेला मनोज भारतीय क्रिकेट संघामध्ये आज ऑलराऊंडर म्हणून नावारूपास आला आहे.
टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना त्याला दिव्यांग क्रिकेट संघाविषयी माहिती मिळाली. यानुसार त्याने प्रयत्न करून जिल्हा पातळीवर फलंदाजी व गोलंदाजीमध्ये अग्रेसर राहिला. पुढे त्याला मुंबई क्रिकेट संघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तीन वर्षे या संघाचा कर्णधार म्हणून त्याने काम पाहिले.
----
गतवर्षी केलेल्या कामगिरीवर निवड
हैदराबाद येथे झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये केलेल्या कामगिरीवर प्रभावित होत त्याला भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात संधी मिळाली आहे. सोमवारी त्याला निवडीचे पत्र मिळाले असून लवकरच तो भारतीय संघातून खेळताना दिसणार आहे. १२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कर्णधार वसंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मनोज आता भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
---
फोटो : ३० मोहोळ