माळशिरस : जागतिक महामारी कोरोनाचा विकास कामांवर मोठा परिणाम झालेला जाणवत आहे. त्यात लॉकडाऊन, प्रतिबंधात्मक योजना व आचारसंहिता यांची भर पडल्याने विकास कामात अडथळे येत आहेत. पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघासाठी लागलेल्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता आहे. तालुक्यातील विविध योजनेंतर्गत सुरु होणाऱ्या विकास कामांना या आचारसंहितेचा खाे बसला आहे. यातील कोट्यवधी रुपयांचा निधी वर्षाअखेर खर्ची न झाल्यास तो शासनाकडे परत जाणार आहे.
यंदा आर्थिक वर्षात सुरुवातीलाच कोरोना व त्यापाठोपाठ पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका व सध्या विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागल्याने बहुतांश वर्षभरात विविध विकास कामांना मुहूर्त साधता आलेला नाही. सध्या वेगवेगळ्या योजनेंतर्गत विकास कामांच्या मंजुरी या अंतिम टप्प्यात आल्या होत्या. याशिवाय वर्षाखेर जवळ आल्याने विकास कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी यांच्या हालचालींना वेग आला आहे. असे असतानाच पंढरपूर -मंगळवेढा विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाली. यामुळे विकास कामांना पुन्हा एकदा खीळ बसली आहे.
---
विकास कामांना झळ
१४ व्या व १५ वा वित्त आयोग, जनसुविधा, दलीत वस्ती, आमदार-खासदार फंड, २५ / १५ योजनेंतर्गत पाणीपुरवठा, मनरेगा, केंद्र व राज्य सरकारच्या योजना, या वेगवेगळ्या योजनेतील कामांना मंजुरी घेता येत नाही. त्यामुळे सहाजिकच यातील काही कामांचा विकास निधी नियोजित कामासाठी वापरणे अडचणीचेेे ठरणार आहे. काही योजनांमधील निधी पुढील वर्षात वापरता येणार नाही.
---
वर्षभरातील विविध अडचणीमुळे वर्षाखेर वेगवेगळ्या योजनातील विकास कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र सध्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता आहे. दुसरीकडे वर्षाखेर असल्याने अनेक विकास कामांना अडथळा येत आहे. त्यामुळे फक्त निवडणुकीच्या ठिकाणी आचारसंहिता असावी, इतर ठिकाणी शिथिलता दिली तरच विकास कामे मार्गी लागतील. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे.
- अर्जुनसिंह मोहिते-पाटील
उपसभापती पंचायत समिती, माळशिरस