बार्शी : शहराच्या विविध भागात रहदारी ठप्पच्या प्रश्नावर संबंधित भागात व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्यांवर तोडगा काढण्यावर सहमती झाली. बार्शी व्यापारी महासंघाने सोमवारी (दि. २०) पुकारलेला बार्शी बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सोमवारी नेहमीप्रमाणे बार्शीतील बाजारपेठ सुरू राहणार आहे.
पोलिसांनी बार्शीत विविध भागात ट्राफिक सुरळीत होण्याच्या अनुषंगाने कारवाई सुरू केली होती. त्यावर व्यापाऱ्यांनी पोलिसांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याच्या निषेधार्थ बंद पुकारला होता. तसे निवेदन त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याकरिता येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन केले होते. त्यात हा निर्णय झाला.
यावेळी बैठकीस मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील व व्यापारी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी मालाचा चढ-उतार करताना रस्त्यावर वाहन उभे केल्यानंतर त्यांना दंड केला जाऊ लागल्याने वाहनचालक बार्शीला येण्यास घाबरत आहेत. रहदारीच्या समस्येची सोडवणूक करताना त्यांनाही विश्वासात घेतले जावे. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन मार्ग काढावा, अशा भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सम-विषम पार्किंग, वन-वेची प्रभावी अंमलबजावणीतूनही वाहतूक समस्येवर तोडगा काढता येईल अशा सूचना उपस्थितांनी केल्या.
नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी व्यापारी हे टॅक्सपेयर आहेत. त्यांच्याशी पोलिसांनी गुन्हेगाराप्रमाणे वागू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
---
वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या पाहता तालुक्यातून बार्शी बाजारपेठेत विविध कारणाने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे साहजिकच येथील रहदारीवर ताण येत आहे. या समस्येवर मार्ग काढताना कायदा व माणुसकी असा समन्वय साधून कार्यवाही व्हावी. शिस्त लावत असताना बाजारपेठेतील व्यापार कमी होऊ नये.
- राजेद्र राऊत
आमदार
---
१५ दिवसांत यावर विविध भागात जाऊन तेथील परिस्थिती जाणून घेऊन समजूतदारपणे यातून मार्ग काढू. त्याला नंतर विरोध करू नये.
- अभिजित धाराशिवकर,
पोलीस उपअधीक्षक
----