सोलापूर : बोरामणी नाका येथे प्लास्टिकच्या टोपणात एक साप अडकून जखमी झाला होता. या जखमी सापावर मुंगसाने हल्ला केला. यात सापाला अधिक दुखापत झाली. वन्यजीवप्रेमींनी वेळीच जाऊन सापावर उपचार करून एक दिवसानंतर निसर्गात मुक्त केले.
एक साप प्लास्टिकच्या टोपणात अडकल्याची माहीती अप्पू होनमुर्गी यांनी सर्पअभ्यासक राहुल शिंदे यांना दिली. घटनेची माहिती मिळताच राहुल शिंदे, शंतनू पुंडा, अजय हिरेमठ घटनास्थळी पोहोचले. ते सर्व घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी झाडीतून मुंगूस आले व त्याने सापावर हल्ला केला. आधीच प्लास्टिकच्या टोपणात अडकलेला साप जखमी होता. त्यात मुंगसाने सापाचे तोंड पकडले. उपस्थित नागरिकांनी लगेच मुंगसास हिसकावून लावले. तोपर्यंत मुंगसाच्या हल्ल्यात सापाच्या एका डोळ्याला जखम झाली.
वन्यजीवप्रेमींनी पाहणी केल्यानंतर जखमी झालेला साप हा बिनविषारी धामण साप असल्याचे समजले. सापाच्या शरीरात अडकलेले प्लास्टिकचे टोपण प्रथम काढण्यात आले. टोपण अडकल्यामुळे सापाच्या शरीराचा काही भाग सुजला होता. त्यात मुंगसाने हल्ला केल्याने तोंडावर जखम होऊन रक्त वाहत होते. सापाला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी ॲनिमल राहत संस्थेकडे आणण्यात आले. या घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली.
डॉ. आकाश जाधव यांनी सापावर वैद्यकीय उपचार केले. सापाच्या एका डोळ्याखाली मुंगसाचा दात लागल्याने रक्तप्रवाह चालू होता. तो उपचार करून थांबविण्यात आला. टोपण अडकून सुजलेल्या भागावर औषध उपचार करून सापाला पाणी पाजण्यात आले. एक दिवस सापाच्या प्रकृतीचे निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले.