सोलापूर : यंदा १९ एप्रिलनंतर उष्णतामानात वाढ होईल. २४ एप्रिलनंतर तापमानात चढ-उतार होत राहतील. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात पर्जन्यमान मध्यम राहील. मधली काही नक्षत्रे पर्जन्यास अनुकूल आहेत; पण एकंदरीत पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहील. मान्सूनचे आगमन थोडे लांबेल, असा अंदाज दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केला आहे.
गेली दोन वर्षे समाधानकारक पाऊस पडत असल्याने यंदाचा पावसाळा कसा असेल याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. गतवर्षी चारही महिने पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. काही भागांत तर अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले; पण नंतरच्या काळात हा पाऊस ऊस शेतीसाठी उपयुक्त ठरला आहे. बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत बहुतेक ठिकाणी पाण्याचे स्रोत सुरूच राहणार अशी स्थिती आहे.
एप्रिल महिना सुरू झाला की शेतकऱ्यांना वेध लागतात हवामान खात्याच्या माहितीचे. विविध पंचांगांच्या माहितीवरही शेतकऱ्यांचा विश्वास असतो. या माहितीवरच शेतकरी पुढील वर्षाचे शेतीचे नियोजन करीत असतात. मान्सूनच्या आगमनाबाबत सोलापूरचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सर्वच नक्षत्रांत पर्जन्यमान कसे असेल याविषयीची माहिती दिली. यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर वळवाचा पाऊस बरसण्याची शक्यता पंचांगकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केली आहे.
-----
असा असेल यंदाचा पावसाळा
मृग नक्षत्र : या नक्षत्राचा पाऊस मध्यम मानाने होईल. हवेतील उष्णतामान फारसे कमी होईल असे दिसत नाही. १२ ते १८, पाऊस अपेक्षित.
- आर्द्रा नक्षत्र - या नक्षत्राचा पाऊस पूर्वार्धात चांगला पडेल. १ जुलैनंतर पर्जन्यमान कमी राहील. भूकंपाची शक्यता दिसते. २६ ते ३० पाऊस अपेक्षित.
पुनर्वसू नक्षत्र - मध्यम वृष्टीचे योग आहेत. १० ते १५ पाऊस अपेक्षित.
पुष्य नक्षत्र - या नक्षत्राच्या उत्तरार्धात पाऊस जोर धरेल. २३ ते २९ पाऊस अपेक्षित.
आश्लेषा नक्षत्र - या नक्षत्राचा पाऊस संमिश्र दिसत आहे. काही भागांत चांगली वृष्टी होईल. ४ ते १२ पाऊस अपेक्षित.
मघा नक्षत्र - या नक्षत्राचा पाऊस समाधानकारक होईल; पण काही भागांत वारा सुटून ढग निघून जाण्याच्या घटना घडतील. २० ते २६ पाऊस होईल.
पूर्वा नक्षत्र - या नक्षत्राचा पाऊस मध्यम ते कमी प्रमाणात होईल आणि सर्वत्र होणार नाही. सप्टेंबर ३ ते ८ पाऊस अपेक्षित.
उत्तरा नक्षत्र - या नक्षत्राचा पाऊस मध्यम प्रमाणात होईल. काही भागांत पिकांना उपयुक्त असा होईल. उष्णतामानात वाढ होईल. १६ ते २२ पाऊस अपेक्षित.
हस्त नक्षत्र - या नक्षत्राचा पाऊस उत्तरार्धात शेवटी बऱ्यापैकी होईल; पण खंडित वृष्टीचे योग आहेत. १ ते ६ ऑक्टोबर पाऊस अपेक्षित.
चित्रा नक्षत्र – या नक्षत्रात पर्जन्यमान चांगले राहील; पण ९ ऑक्टोबरनंतर काही भागांत पाऊस ओढ धरेल. १३ ते १९ पाऊस अपेक्षित.
स्वाती नक्षत्र – या नक्षत्राचा पाऊस फारसा होणार नाही. २८ ते ३१ पाऊस अपेक्षित.