सोलापूर : यंदाच्या वर्षी केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन वेळेवर होईल. महाराष्ट्रात १० जूनपासून मान्सूनची सुरुवात होईल. विशेषतः जुलै, ऑगस्टमध्ये सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात पाऊस समाधानकारक होईल. एकंदरीत सरासरीइतका किंवा थोडा अधिक पाऊस होईल, असा अंदाज सोलापुरातील प्रसिध्द पंचांगकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केला आहे.
मागील वर्षी सोलापूर शहरासोबत जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस पडल्याने सध्या जिल्ह्यातील उजनी धरणासह औज, हिप्परगा, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, लघू व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गाठला आहे. त्यामुळे सोलापूर शहरात सहा दिवसांआड तर ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. जिल्ह्यातील पाणीसाठ्याची सद्य:स्थिती उजनी धरणात वजा ३७.०९ टक्के, तर सात मध्यम प्रकल्पांत १०.९९ टक्के, ५६ लघुप्रकल्पांत २.६८ टक्के, तर ९० कोल्हापूर बंधाऱ्यात १८.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. धरणे, विहिरी, नद्या, नाले, बंधारे कोरडे पडू लागल्याने सोलापूरकरांना मोठ्या पावसाची आशा लागून राहिली आहे. यंदा तरी समाधानकारक पाऊस पडेल, असा दिलासादायक अंदाज दाते यांनी व्यक्त केला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत गुरुपुष्यामृत योगसप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकूण ३ गुरुपुष्यामृत योग आहेत. या वर्षी ६ मे ते २५ जून शुक्राचा अस्त असून, ८ मे ते १ जून या कालावधीत गुरूचा अस्त आहे. त्यामुळे ८ मे ते १ जून या कालावधीत एकत्रितपणे गुरू व शुक्राचा अस्त असल्याने कोणत्याही मंगल कार्याकरिता मुहूर्त नाहीत. २९ मार्च २०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत असणार असून मकर, कुंभ आणि मीन या राशींना साडेसाती आहे. या वर्षी ज्येष्ठ महिन्यात २५ जून रोजी अंगारकी चतुर्थीचा योग आहे.