पंढरपूर : मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यामुळे गोपाळपूरजवळील चंद्रभागा नदीपात्रात असलेल्या श्री विष्णुपद मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे़ मात्र सध्या नदीच्या पात्रात पाणी आहे़ शिवाय पाण्याचा मंदिराला वेढा आहे. या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी मंदिर समितीच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे़ शिवाय लोखंडी बॅरिकेडिंग केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री विठ्ठल हा गोपाळपूरनजीक असणाºया विष्णुपद मंदिरात गेले होते, अशी भाविकांची भावना आहे़ त्यामुळे या महिन्यात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक विष्णुपद मंदिराला नक्कीच जातात़ या ठिकाणी येणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचे विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
श्री विष्णुपद मंदिरासमोर असणाºया कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयामुळे सध्या भीमा नदीपात्रात पाणी आहे. यामुळे विष्णुपद मंदिरामध्ये दोन ते तीन फुटाच्या आसपास पाणी आहे. पाण्यामुळे भाविकांचा जीव धोक्यात पडू नये, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्रीविष्णुपदाच्या चारही बाजूला लोखंडी व लाकडी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. तसेच मंदिरामध्ये जाण्यासाठी असलेल्या पुलाला देखील बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याने पंढरपूर शहरासह तालुक्यातील भाविक सहकुटुंब या ठिकाणी दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर ग्रामीण व शहरी भागातील शाळांच्या सहलीही या ठिकाणी येतात. या ठिकाणी निसर्गरम्य परिसर असल्याने सहकुटुंब भोजनाचा आस्वादही घेतात.
मंदिर समितीकडून स्वच्छतेवर भर- विष्णुपदाकडे जाणाºया मार्गावरील खड्डे मंदिर समितीच्या वतीने बुजविण्यात आले आहेत. शिवाय या परिसरात काटेरी झाडे होती़ तीही तोडण्यात आली आहेत़ ट्रॅक्टरच्या साह्याने झाडे, गवत काढून हा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ठिकठिकाणी कचºयासाठी डबे ठेवण्यात आले आहेत. या परिसराची रोज स्वच्छता व्हावी, यासाठी चार स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन संरक्षक नेमले आहेत, अशी माहिती विठ्ठल जोशी यांनी दिली.