कुर्डूवाडी : सोलापूरला मराठा क्रांती मोर्चाचे रविवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते. असंख्य कार्यकर्ते हे खासगी वाहने घेऊन निघाले होते. परंतु कुर्डूवाडी परिसरात तीन पोलीस चेक पोस्ट नाक्यांच्या माध्यमातून पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. पुढे शहरात प्रवेश मिळणार नाही, असे सांगत मोर्चेकऱ्यांना परत पाठवून दिले.
सोलापूरला संचारबंदी असून गर्दी करता येणार नाही, वाहनातून इतक्या जणांना परवानगी नाही, आम्ही जरी येथून सोडले तरी, पुढे शहरात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, असे सांगत माघारी जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना आल्यापावली परत जावे लागले. नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच घोषणाबाजी केली.
कुर्डूवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत बायपास मार्गावरील टोल नाक्यावर, संकेत मंगल कार्यालयासमोर व भुताष्टे फाट्यावर चेक पोस्ट तयार केले होते. बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. यावेळी परिसरातील असंख्य कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी होण्यासाठी उत्साहात निघाले. परंतु त्यांना या संबंधीत तीन चेक पोस्ट नाक्यांवर अडविले गेले.
यावेळी पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांच्यासह पाच पोलीस अधिकारी व ६० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला होता.
..................
फोटो : ०४ कुर्डूवाडी
मराठा आक्रोश मोर्च्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना कुर्डूवाडी चेक पोस्टवरून माघारी पाठविताना पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे.