सोलापूर : शंभराहून अधिक वर्षांपासून पार्क मैदानाच्या शेजारी उभे असलेल्या डेरेदार शमीवृक्षाला तीन प्रदक्षिणा घालून सोलापूरकर उद्या दसºयाच्या दिवशी सीमोल्लंघन करणार आहेत. या वृक्षाच्या पूजेचा मान परंपरेने ग्रामजोशी यांच्याकडे आहे. सोलापूरकरांची आराध्यदेवता रूपाभवानी माता तसेच इंद्रभवानी मातेच्या पालख्याही याच ठिकाणी सीमोल्लंघनासाठी येणार आहेत.
श्रीरामाने रावणावर मिळविलेल्या विजयानंतर शमीच्या वृक्षाची केलेली पूजा, दुर्गामातेने महिषासुराचा केलेला वध तसेच शमी वृक्षाच्यावरुन शस्त्रास्त्रे घेऊन कौरवांचा केलेला पराभव अशा अनेक गोष्टी दसºयाशी संबंधित आहेत. निसर्गाशी आपले नाते सांगणाºया शमी वृक्षाच्या पूजेला खूप महत्त्व आहे.
शतक पार केलेल्या पार्क चौक येथील शमी वृक्षाची पूजा करण्यात येते. पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शन घेण्यात येते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविक आपल्या घरात घटस्थापना करतात. नऊ दिवसांनंतर घटातील धान्य घेऊन ते शमीच्या वृक्षाला अर्पण करतात. शहरातील पार्क चौक येथे अनेक भाविक शमीच्या वृक्षाला धान्य अर्पण करुन प्रदक्षिणा घालतात. तिथे असलेले ग्रामजोशी शमी मंत्र म्हणून आपट्याची पाने भाविकांना देतात. तिथे आलेले भाविक एकमेकांना आलिंगन देऊन दसºयाच्या शुभेच्छा देतात. आपट्याची पाने ही प्रेमाचे प्रतीक असल्याने ती एकमेकांना देण्यात येतात.
या दिवशी शस्त्रपूजनालाही विशेष महत्त्व असते. परवानाधारक असलेले भाविक पिस्तूल, तलवार आदी शस्त्रे घेऊन शमीच्या झाडाखाली पूजा करतात.
शमीच्या वृक्षाचे महत्त्व- तुळशीप्रमाणे शमीचे वृक्ष घराच्या परिसरात लावणे शुभ मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा हा वृक्ष शोषून घेतो तर घरात सकारात्मक ऊर्जा पसरवितो. वास्तुशास्त्रानुसार या वृक्षाचे महत्त्व आहे. गणपतीसोबतच महादेवालादेखील शमी वृक्ष प्रिय आहे. शमी वृक्ष विषम परिस्थितीतही जिवंत राहू शकतो. स्वत:च्या सुरक्षेसाठी या वृक्षाला काटेही असतात. आयुर्वेदिकदृष्ट्याही शमीच्या वृक्षाला महत्त्व आहे.
शमीच्या वृक्षाची पूजा करण्याचा मान हा ग्रामजोशींना असतो.शंभराहून अधिक वर्षांचा हा मान सोलापुरातील जोशी कुटुंबीयांना मिळाला आहे. सोलापूर तसेच शेजारील १६ खेड्यांतील पौरोहित्य हे जोशींकडून केले जाते. शमीच्या झाडाखाली देवीची प्रतिमा प्रस्थापित करण्यात आली आहे. त्या प्रतिमेची पूजा केल्यानंतर देवीला साडी, हार, पेढे आदी पूजेचे साहित्य अर्पण करण्यात येते. भाविक या शमीच्या वृक्षाचे दर्शन घ्यायला येतात. - गजानन जोशी, शमी वृक्षाचे पुजारी