सोलापूर : वीज ही अत्यावश्यक असताना घरगुती खर्चात मात्र वीजबिलांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची स्थिती असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर थकबाकीदार ग्राहकांच्या तुलनेत सर्वाधिक 27 लाख 44 हजार घरगुती ग्राहकांकडे 863 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे. घरगुती ग्राहकांनी मूलभूत गरज बनलेल्या विजेसाठी थकीत व चालू बिलांचा भरणा करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणकडून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून थकबाकी वसुल करण्याची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरु आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 3) व रविवारी (दि. 4) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 31 लाख 37 हजार 389 ग्राहकांकडे 1290 कोटी 70 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वाधिक 87.46 टक्के थकबाकीदार ग्राहक हे घरगुती वीजवापर करणारे आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी तसेच ऑनलाईन शिक्षण व कार्यालयीन कामांसह इतर घरगुती कामांसाठी विजेची नितांत आवश्यकता आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रात महावितरणच्या एकूण घरगुती 58 लाख 28 हजारांपैकी तब्बल 27 लाख 44 हजार (47 टक्के) घरगुती ग्राहकांनी वीजबिल थकविलेले आहे.
वाणिज्यिक व औद्योगिक तुलनेत प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसाठी 300 युनिटपर्यंत प्रतियुनिट वीजदर सवलतीचे आहेत. घरातील किमान दोन ते तीन संख्येत असलेल्या मोबाईल सेवेचे तसेच डिश टिव्ही किंवा स्वतंत्र इंटरनेट कनेक्शनचे रिचार्ज वेळेत केले नाही तर त्याच दिवशी तात्काळ सेवा खंडित केली जाते. याउलट वीज ही अत्यावश्यक असूनही त्याचे बिल वेळेत भरले जात नाही अशी स्थिती आहे. घरगुती वीजवापरासाठी सवलतीचे वीजदर आहेत. तरीही अनेक महिन्यांचे वीजबिल थकीत राहते. त्यामुळे महावितरणला नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागते. महावितरण ही सरकारी कंपनी असल्याने नफा कमाविणे हे ध्येय निश्चितच नाही. पण कोणत्याही प्रकारचे अनुदान नसल्याने महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच आहे. वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च आदींचा सर्व खर्च हा वीजबिल वसुलीवरच अवलंबून असतो. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू वीजबिलांचा प्राधान्याने भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जिल्हानिहाय एकूण घरगुती ग्राहकांच्या तुलनेत पुणे जिल्हा- 12 लाख 20 हजार 350 (39.46 टक्के) ग्राहकांकडे 439 कोटी 67 लाख, सातारा- 3 लाख 39 हजार 355 (51.57 टक्के) ग्राहकांकडे 55 कोटी 33 लाख, सोलापूर- 4 लाख 480 (65.38 टक्के) ग्राहकांकडे 140 कोटी 98 लाख, सांगली- 3 लाख 19 हजार 143 (54.18 टक्के) ग्राहकांकडे 91 कोटी आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 लाख 64 हजार 701 (53 टक्के) घरगुती ग्राहकांकडे 136 कोटी 48 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.