शेतकऱ्यांनी ५० टक्के थकबाकी सवलतीचा लाभ घेऊन मागील थकबाकीसहचालू बाकी ३१ मार्च अखेर भरून आपलं विज बिल कोरे करून घ्यावे असे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी केले आहे. महावितरण कंपनीमार्फत कृषी पंपाच्या सप्टेंबर २०२० पर्यंत चालू बिलासह थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के सवलत मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपाचे सर्वाधिक ३,३५० ट्रान्सफॉर्मर एकट्या सांगोला तालुक्यात आहेत. शेतीपंपाची सर्वाधिक ४१० कोटीची थकबाकीही याच तालुक्याकडे असूनही बिल भरण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सांगोला येथील महावितरण कार्यालयामार्फत तालुक्यातील शेती पंपाच्या ग्राहकांना मागील थकबाकीसह चालू वीज बिले यापूर्वीच घरपोच केली आहेत.
तालुक्यातील ३३ हजार ८८६ शेतकऱ्यांकडे सुमारे ३९५ कोटी ७० लाख रूपये थकबाकी व सप्टेंबर २० ते डिसेंबर २०२० पर्यंत चालू २५ कोटीची बाकी येणे आहे. आत्तापर्यंत केवळ २७१ शेतकऱ्यांनी ५० लाख ६४ हजार रुपये बाकी भरली आहे.
----
वरिष्ठ कार्यालयाकडून थकबाकी असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ट्रान्सफार्मरवरील वीजपुरवठा सुरळीत ठेवून महावितरणच्या कृषी वीज बिल माफीचा लाभ घेण्यासाठी थकबाकीसह चालू वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे
- आनंद पवार, उपकार्यकारी अभियंता,
चालू बिलापोटी ५४४ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
- सांगोला शहर व तालुक्यात महावितरणचे घरगुती, व्यवसायिक व औद्योगिक सुमारे २१ हजार ३५७ ग्राहकांकडील १३ कोटी थकबाकीपैकी ३ कोटी ३५ लाख रुपये मार्चपर्यंत वसूल झाले आहेत तर तालुक्यातील पाणीपुरवठ्याच्या १७३ ग्राहकांकडे सुमारे ६ कोटी २४ लाख रुपये थकबाकी येणे आहे. अशा परिस्थितीत ३९ लाख १३ हजार थकबाकीसह चालू वीज बिलापोटी ५४४ ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित केला आहे.