सोलापूर: बहुचर्चित एकरुख आणि शिरापूर या दोन उपसा सिंचन योजनांची सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) आज (सोमवारी) मंजूर करण्यात आली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हा निर्णय झाला. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या दोन्ही योजनांसाठी पुढाकार घेतला होता.
अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पासाठी एकरुख येथून उजनीचे पाणी नेणारी एकरुख उपसा सिंचन योजना आहे. गेल्या १० वर्षांपासून ही योजना रखडली होती. निधी उपलब्ध असूनही तो सुप्रमा नसल्याने खर्च करता येत नव्हता. सुप्रमाच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मात्र कथित सिंचन घोटाळ्यामुळे ही योजना लालफितीत अडकली होती़ सध्या एकरुखसाठी ४२ कोटी निधी शिल्लक असला तरी तो अखर्चित आहे. सुप्रमा नसल्याने ठेकेदारांची बिले प्रलंबित होती. रकमा न मिळाल्याने ठेकेदारांनी काम थांबवले होते.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी एकरुख आणि शिरापूर योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली. यापूर्वी सर्व सोपस्कार पूर्ण झाले होते. केवळ अर्थमंत्र्यांनी तिला संमती देणे आवश्यक होते. आज या योजनेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापूर उपसा सिंचन योजनेची सुप्रमाअभावी अनेक कामे रखडली होती.
या योजनेला मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील रखडलेल्या या दोन्ही योजना शेतकºयांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. विधानसभेच्या गेल्या चार निवडणुका याच मतावर लढल्या गेल्या. त्यामुळे उजनीचे पाणी हे अक्कलकोट तालुक्यातील शेतकºयांसाठी मृगजळ वाटत होते. अर्थमंत्र्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न लवकर मार्गी लागणार आहे. या निर्णयाची शेतकºयांना कमालीची उत्कंठा होती.
या बैठकीला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता गोटे, मुख्य अभियंता रजपूत, सोलापूर भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, सोलापूर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता बाबुराव बिराजदार यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
शेतकºयांमध्ये जल्लोषएकरुख उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याची बातमी अक्कलकोट तालुक्यात येऊन धडकताच चुंगी, कुरनूर, हन्नूरसह संपूर्ण तालुक्यातील शेतकºयांनी एकच जल्लोष केला.