सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथे अज्ञात कारणावरून आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
चित्रा बाबासाहेब हाक्के (वय २८), पृथ्वीराज बाबासाहेब हाक्के (५) आणि स्वराज बाबासाहेब हाक्के (२, सर्व. रा. वांगी, ता. उत्तर सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. चित्रा हाक्के दुपारी १२ वाजता त्या दोन्ही मुलांना घेऊन घराच्या बाहेर पडल्या. सायंकाळी ५:३० वाजता विहिरीत चित्रा यांच्यासह स्वराज तरंगताना दिसले.
सांगोल्यात तलावात पाय घसरून पडल्याने महिलेचा बुडून मृत्यू
सांगोला : कपडे धुण्यासाठी सुवर्णा लवटे तलावात उतरताना अचानक पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल बुधवारी सकाळी १० च्या सुमारास निजामपूर, ता. सांगोला येथील दऱ्याबा तलावात घडली.
सुवर्णा भाऊसाहेब लवटे असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुवर्णा हिच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा, असा परिवार आहे. निजामपूर येथील सुवर्णा लवटे व तिची इयत्ता तिसरीत शिकणारी मुलगी अश्विनी अशा दोघी मायलेकी मिळून बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घराच्या पाठीमागे असलेल्या दऱ्याबा तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तलावातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाय घसरून पाण्यात पडल्याने सुवर्णा लवटे या बुडू लागल्या. त्यावेळी तलावाच्या बाहेर उभी राहिलेल्या अश्विनीने आई पाण्यात बुडत असल्याचे पाहून आरडाओरडा केली. तिने घरी येऊन ही घटना नातेवाइकांना सांगितली. दरम्यान सुवर्णाचे पती भाऊसाहेब लवटे वाटंबरे येथे गॅस आणायला गेले होते. त्यांनाही या घटनेची माहिती दिली. दरम्यान तलावाच्या आजूबाजूच्या लोकांनी पाण्यात बुडालेल्या सुवर्णा यांना बाहेर काढून तातडीने बेशुद्ध अवस्थेत उपचाराकरिता सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.