सांगोला : दीड लाखाच्या मोबदल्यात रस्ता दिला नाही म्हणून संतापलेल्या पाच जणांनी मुरुम टाकताना ट्रॅक्टरचे शूटिंग करणाऱ्या मुलास व त्याच्या आईस दमदाटी करीत मारहाण केली. दरम्यान, एकाने शूटिंग केलेला मोबाइल त्याच्या खिशातून काढून घेतला.
ही घटना शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास सांगोला तालुक्यात सोनंद येथे घडली. बेबीताई कुलकर्णी यांचे पती पांडुरंग व मुलगा हणमंत घरी असताना शुक्रवारी सकाळी ८च्या सुमारास गावातील मुकेश काशीद, केशव काशीद हे त्यांच्या घरी आले. दीड लाखाच्या मोबदल्यात शेतामधून रस्ता द्या म्हणाले असता त्यांनी नाही म्हणून सांगितले. त्यानंतर ते दोघे तेथून निघून गेले. शुक्रवारी पुन्हा त्या दोघांसह महिपती बोराडे, उमेश काशीद, विकास काशीद असे पाचजण ट्रॅक्टरसह जेसीबी घेऊन आले. त्यांनी ट्रॅक्टरमधील मुरुम टाकण्यास सुरवात केली. दरम्यान, बेबीताई यांनी स्वत:ला एकच एकर शेती असून, येथे मुरुम टाकू नका, रस्ता द्यायचा नाही. तुम्ही कायदेशीर मार्गाने न्यायालयातून आदेश घेऊन या तेव्हाच रस्ता देतो म्हणून त्या ट्रॅक्टरच्या आडव्या उभ्या राहिल्या. यावेळी संतापलेल्या मुखेश काशीद, समाधान काशीद यांनी तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत बाजूस ढकलून दिले. त्यावेळी मुलगा हणमंत सोडविण्यासाठी मधे आला असता त्या दोघांनी त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आमचे शूटिंग काढतो काय असे म्हणत त्यांनी त्याचा मोबाइल काढून घेतला. याबाबत बेबीताई कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.