पण क्रूर नियतीला हे मान्यच नव्हतं. अर्धांगवायू होऊनही अभिमान कुटुंबासाठी कष्ट घेत होते, पण ऑगस्ट २०१९ मध्ये माढा रोडवर अपघातात त्यांचेही निधन झालं. कुटुंबातील कर्ता पुरुषच उरला नाही. या सासू-सुनेसमोर मोठे संकट आले. दोघींनीही बळ बांधले, दु:ख सावरले, कंबर कसली, सर्वच कामाची जबाबदारी आता दोघींवर होती. बागांची औषधे आणून बागेतील कामासाठीच्या कुशल मजुरांचे व्यवस्थापन करणे या बाबी सासूंनी उचलल्या, तर ट्रॅक्टर शिकून बागेतील मशागत, फवारण्या या जबाबदाऱ्या सुनेने उचलल्या. शिवाय मुलांच्या शिक्षणाकडेही दोघींनी लक्ष दिले.
घरात कोणीही पुरुष नसताना सासू-सुनांनी प्रपंचाची पुन्हा घडी बसवली आहे. सध्या आता चार एकर द्राक्षबाग व दोन शेड त्या लीलया सांभाळत आहेत. त्यांनी आतापर्यंत फक्त बेदाणा करूनच द्राक्षे विकले आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेले नुकसान यावर्षी भरून निघण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.