ग्रामीण भागात कोरोनाचा कहर दररोज वाढत चालला आहे. अशाच प्रकारे कोळीबेट येथे सुशीलाबाई विठ्ठल पारशेट्टी ( ७०) यांना कोरोना झाल्याचे निदान वेळीच झाले नाही. १३ मे रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी अक्कलकोट येथील एका खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेले. अत्यवस्थ स्थिती पाहून स्वतः डॉक्टरांनी त्यांना अक्कलकोट येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ॲंटिजन तपासणी करून उपचार सुरू केले. केवळ दहा मिनिटांत मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी अडीच वाजता कोळीबेट येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.
त्याच दिवशी त्यांचा मुलगा शिवशरण विठ्ठल पारशेट्टी (४८) यांना सायंकाळी साडेसात वाजता अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा नातेवाईकांनी तत्काळ पुन्हा आईला तपासलेल्या ठिकाणीच खासगी दवाखान्यात दाखल नेले. तपासून पुन्हा तेच डॉक्टर सोबत येऊन त्यांनी कोरोना तपासणी केली. रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, गंभीर स्थितीमुळे केवळ दहाच मिनिटांत मुलाचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
---
तोच आजार.. तीच स्थिती, तेच बेड अन् हॉस्पिटल
आईची ऑक्सिजन पातळी कमी होती. अंगात ताप, अंगदुखी असा त्रास होता. मुलाच्याही शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली होते. दोघांनाही एकच लक्षणे दिसून आली. दोघांचाही एकाच दिवशी, आजार कोरोना, तेच खासगी डॉक्टर, तेच कोरोना हॉस्पिटल, तेच बेड, दोघांनासुद्धा ऑक्सिजन लावत असताना केवळ दहाच मिनिटात मृत्यू झाला आहे. मृत शिवशरण आजारी असल्याने दुपारी आईच्या अंत्यविधीच्या वेळी शेवटचे तोंडही पाहता आले नाही.
----
२२ शिवशरण पारशेट्टी-कोळीबेट
२२सुशीलाबाई पारशेट्टी-कोळीबेट