शीतलकुमार कांबळे
सोलापूर : होटगी रोड परिसरात सहज रस्त्यावरुन जाताना एक नजर टाकली की समोर दिसते लेकुरवाळी आई. आपल्या तान्हुल्या लेकराला घेऊन जेवणासाठी भटकंती करतेय. मागील तीन महिन्यांपासून काम नसल्यामुळे मुलांना तरी काय खाऊ घालायचं ? या प्रश्नाचे उत्तर शोधत ४३ ते ४४ अंश सेल्सिअस इतक्या तळपत्या उन्हात त्यांचा जगण्याशी संघर्ष सुरू आहे.
शहरात मागील काही वर्षांपासून काही महिला या भिक्षा मागताना दिसत होत्या. यातील बहुतांश महिला या परप्रांतीय होत्या. लॉकडाऊननंतर त्या त्यांच्या गावाकडे गेल्या असाव्यात. लॉकडाऊननंतर काही महिला आपल्या मुलांना घेऊन भिक्षा मागताना दिसत आहेत.
या महिला बाहेरच्या नसून सोलापुरातीलच आहेत. विजापूर रोड येथील चैतन्य नगर शेजारी यांची वस्ती आहे. दगड फोडणे, लिंबू विकणे, फुगे विकणे आदी काम ते करत असतात. लॉकडाऊनमुळे खाण बंद झाली, त्यामुळे दगड फोडण्याचे काम गेले. दुकाने आणि बागा बंद असल्यामुळे लिंबू आणि फुगे विकता येत नाहीत. त्यामुळे भिक्षा मागण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय राहिलेला नाही.
सकाळी सहा वाजल्यापासून भटकंतीला सुरुवात होते. मंदिर, दर्गा, मस्जिद सारखी प्रार्थनास्थळे सध्या बंद आहेत. त्यामुळे जिथे लोक येतील तिथे या महिला जातात.
शहरातील पेट्रोल पंप, बँक, एटीएम सेंटर ही भिक्षा मागण्याची ठिकाणे झाले आहेत. काही ठिकाणी सुरू असलेल्या किराणा दुकानासमोर उभे राहिल्यास तिथला ग्राहक खाण्यास देतो.
सुरुवातीला शासन व सामाजिक संस्थांनी मदत काहीच दिवस केली. सर्वांना ही मदत मिळाली नाही. ज्यांच्याकडे दगड फोडण्याचे काम करतो त्यांनीही मदत केली नसल्याचे महिलेने सांगितले.
उन्हामुळे बाळाची रडरडही थांबत नाही- लहान असतानाच बाळाला चांगला आहार मिळाला तर तो सशक्त बनतो. त्यासाठी आईलाही चांगला आहार करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाळाला दूध मिळते व त्याची चांगली वाढ होते. चांगला आहार तर दूरच राहिला त्यांना दोनवेळचं जेवायला मोठ्या मुश्किलीने मिळत आहे. भर उन्हात फिरत असल्यामुळे बाळ नेहमी रडतच असते. कुणाला दया आली तर काहीतरी मिळते. थोडे पैसे मिळाले तर दूध घेऊन बाळाला पाजले जाते. नागरिकही घराबाहेर पडत नसल्यामुळे भिक्षा मागूनही पोट भरत नसल्याचे या महिलांनी सांगितले.