सांगोला : रामप्रहरी डिकसळ गावात दबक्या आवाजात इंगोल्याच्या डोंगर खो-यात माणूस मारून पोत्यात घालून टाकल्याची चर्चेला उत्त आला होता गावात कोणाचा खून तर झाला नसेल ना ? या चर्चेमुळे गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्षांसह ग्रामस्थानी या घटनेची खातरजमा करण्यसाठी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांच्या साक्षीने पोलीस पाटलांनी पोत्याची गाठ सोडताच पोत्यात चक्क कुत्र्याचा कुजलेला मृतदेह निघाला आणि ग्रामस्थांच्या जीवात जीव आला. हा प्रकार काल रविवारी सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आल्याने डिकसळ गावात दिवसभर जोरदार चर्चा रंगली होती.
डिकसळ (ता.सांगोला) गावच्या पश्चिमेला इंगोले- पवारवस्ती शेजारी असलेल्या वनपरिक्षेत्राच्या दरीच्या खोऱ्यात माणूस मारून पोत्यात घालून टाकला आहे अशी माहिती गुराख्याकडून मिळाल्याने वस्तीवरील लोकांमधून घबराट पसरली. याबाबतची माहिती रविवार १४ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास पोलीस पाटील यांना देण्यात आल्यानंतर गावात चर्चेला उत्त आला गावातील प्रत्येकजण पोत्यात बांधून मारून टाकलेला माणूस कोण ? याची चर्चा रंगली दरम्यान दरीचे खोरे हे गावापासून ३ कि.मी असून इंगोले पवार वस्तीपासून १कि.मी. अंतरावर आहे.
या घटनेची खातरजमा करण्यासाठी तंटामुक्त अध्यक्ष व पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थ त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठ्याप्रमाणात दुर्गंधी येत होती. अखेर पोलीस पाटील यांनी धाडसाने पोत्याची गाठ सोडल्यानंतर त्यामध्ये कुजलेल्या अवस्थेतील चक्क कुत्र्याचा मृतदेह निघाला आणि सर्वांच्या जीवात जीव आला. परंतु हे कुत्रे मारून पोत्यात भरून कोणी टाकले का टाकले ? कोणी पाहिली नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान यापूर्वी ही वायफळ घाटावर व करांडेवस्तीवर अशा दोन घटना घडल्याने डिकसळकर भयभीत झाले आहेत.
---------------------------
वनपरिक्षेत्रात मागील ५-६ दिवसापूर्वी पोत्यात बांधून कुत्रे मारून टाकले होते हे वनमजुरांना कसे दिसले नाही ? वनमजूर काय कामे करतात ? कुत्रा पाळीव प्राणी असताना कशासाठी मारून पोत्यात भरून टाकला ? याचा शोध घेणे वनविभागाचे काम आहे.
- अशोक करताडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष