महाराष्ट्रातील वस्त्यांची जातिवाचक नावे हद्दपार करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. यासाठी विशेष मोहीमही राबविली जाणार आहे. सोलापुरात पूर्वी पांजरापोळ चौकाच्या शेजारील वसाहत जातिवाचक नावाने ओळखली जायची. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वसाहतीचे नामकरण थोरला राजवाडा असे केल्याचे सामाजिक कार्यकर्ते आवर्जून सांगतात. या चौकाच्या बाजूलाच असलेल्या वस्त्यांना मातंगवाडा, धनगरवाडा, रजपूत गल्ली, चांभारवाडा, वडारवाडा अशी नावे दिलेली होती. यातील काही नावे बदलण्यात आली. वडार गल्लीचे नामकरण लक्ष्मण महाराज नगर करण्याचा ठराव महापालिकेत मंजूर करण्यात आला होता. नामाभिधान समितीने यास मंजुरी दिल्याचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्याकडून सांगण्यात आले. मातंग वस्तीचे नामकरण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर असे झाले. सफाई कामगार वसाहतीचे नावही जातिवाचक घेतले जायचे. या वस्तीचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर झाले. पत्रातालीम परिसरात कैकाड गल्ली, चौपाड परिसरात बामण गल्ली यासह शहराच्या विविध भागात माळी गल्ली, कुंभारी गल्ली, कुंचीकोरवी गल्ली, क्षत्रीय गल्ली, वैदू वस्ती, ढोर गल्ली, लोधीपुरा अशी नावे आजही आहेत.
----
सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वसाहतींची जातिवाचक नावे बदलण्याचे काम केले आहे. आणखी बरेच काम शिल्लक आहे. आता राज्य शासनच यासंदर्भात मोहीम राबविणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे. परंतु, जात-पात सोडण्यासाठी खूप प्रयत्न आवश्यक आहेत. प्रत्येक समाजात आता समाजभान असलेले तरुण-तरुणी आहेत. त्यांनी वसाहतींची नावे बदलण्याच्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे.
- कॉ. रवींद्र मोकाशी, परिवर्तन अकादमी.