सोलापूर :महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.२७ मे रोजी राज्यभर आंदोलने करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डिझेल दरात वारंवार झालेली वाढ, टायर व सुट्या भागाच्या किमतीत झालेली वाढ, समपातळीवर नसलेली प्रवासी वाहतूक स्पर्धा, शासनाचे प्रतिकूल धोरण यामुळे एस.टी. तोट्यात जात आहे. तसेच वरिष्ठ प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव, संघटनेने उत्त्पन्नवाढीसाठी सुचविलेल्या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने एस.टी.च्या उत्पन्नवाढीला मर्यादा येत आहेत. परिणामी कामगारांचे मान्य केलेले प्रश्न सुटण्यास विलंब होत आहे. २0१२-२0१६ या कालावधीसाठी झालेल्या वेतन करारास १ वर्षे होऊनसुद्धा कामगारांना सुमारे ५५0 कोटी इतकी थकबाकीची रक्कम मिळणे आवश्यक आहे. मात्र शासनाकडून महामंडळास १ हजार ८४0 कोटी इतकी रक्कम देण्यास विलंब होत असल्याचे कारण पुढे करून प्रशासन कामगारांना थकबाकीची रक्कम देण्यास विलंब करीत आहे. वाढीव महागाई भत्त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. या स्थितीला कामगार जबाबदार नसतानाही त्यांचे आर्थिक प्रश्न सुटण्यास विलंब होत आहे. अशा एक ना अनेक बाबींची पूर्तता होण्यासाठी दि.२७ मे रोजी राज्यभर विभागीय कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत, असे हनुमंत ताटे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस प्रशांत गायकवाड, शिवाजीराव दळवी, प्रकाश आगरकर, तानाजी सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना
By admin | Published: May 09, 2014 10:48 PM