सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या वारंवार भेटीची खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दखल घेत मंगळवारी सोलापुरात वीरशैव लिंगायत समाजातील विविध मान्यवरांच्या भेटी घेत ‘उत्तर’ दिले आहे.
जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीच्या निमित्ताने समितीचे अध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते-पाटील मंगळवारी सोलापुरात आले होते. शासकीय विश्रामधाम येथील ही बैठक आटोपल्यानंतर त्यांनी शहरातील विविध नेत्यांना अचानकपणे भेटी दिल्या. यात श्री सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या गंगा निवास येथे त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, राजू सुपाते उपस्थित होते. हे सर्व जण बाहेर थांबले तर काडादी व मोहिते-पाटील यांनी बंगल्यात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत अर्धा तास चर्चा केली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युती झालीच तर शहर उत्तर सोलापूर विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा राहणार आहे. त्यादृष्टीने शहर उत्तरमध्ये संभाव्य उमेदवार कोण असावा, याबाबत गुफ्तगू झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी शहर उत्तर मतदार संघातील वीरशैव लिंगायत समाजातील नेत्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये राजशेखर शिवदारे हे विश्रामगृह येथे भेटीला आले होते. कक्षात दोघांची १५ मिनिटे चर्चा झाली. सुरेश हसापुरे यांना भेटीला येण्यास वेळ झाला. त्याचबरोबर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील राजकारणाबाबत चर्चा करून कानोसा घेतल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर कुंभारी येथील वीरशैव प्रतिष्ठानच्या कार्यालयास खासदार मोहिते-पाटील यांनी भेट दिली. प्रतिष्ठानचे जगदीश पाटील, राजशेखर विजापुरे, जगदीश लिगाडे, सिद्धय्या स्वामी, मनोज कोल्हे, अशोक नागणसूर, गिरीश मंद्रुपकर, विजय बुरकुल यांनी त्यांचे स्वागत केले. पालकमंत्र्यांवर नाराज असलेल्या गटाची खासदार मोहिते-पाटील यांनी भेट घेतल्याने कुंभारीतही हा विषय चर्चेचा झाला आहे.
अचानक भेटीने चर्चा...- सुरक्षा समितीची बैठक आटोपल्यानंतर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे धर्मराज काडादी यांच्या भेटीला गेल्याची चर्चा सोलापुरात सुरू झाली. त्यानंतर या भेटीचा कानोसा घेतल्यानंतर पालकमंत्र्यांना ‘उत्तर’ देण्याची तयारी करीत असल्याचे सांगण्यात आले. माढा मतदार संघातील नेत्यांशी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केलेल्या जवळिकीची दखल घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.