सोलापूर : मराठा आरक्षणासंदर्भात होणाºया जनसुनावणीवेळी विविध सामाजिक संघटनांबरोबरच जिल्ह्यातील दोन खासदार आणि सर्व आमदारांच्या वतीने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, जनसुनावणीवेळी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात विशेष बैठक घेऊन नियोजन केले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात जनसुनावणी होणार आहे. आयोगाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा. राजाभाऊ करपे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवेदन स्वीकारणार आहेत. यासंदर्भात सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, दत्तामामा मुळे, राजू सुपाते, राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख, रवी मोहिते आदींनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार दिलीप सोपल, आमदार भारत भालके यांची भेट घेतली. जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींनाही संपर्क केला. आयोगासमोर आपणही आपले निवेदन सादर करावे, अशी विनंती त्यांनी केली. जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी आमदार निवेदन सादर करणार असल्याचे समन्वयकांकडून सांगण्यात आले.
शुक्रवारी मुंबईमध्ये साखर कारखान्याच्या प्रश्नासंदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे काही लोक मुंबईच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
‘संगमेश्वर’च्या मैदानावर वाहनतळ- शुक्रवारी होणाºया जनसुनावणीवेळी प्रचंड गर्दी होणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, आरोग्य विभाग, समाजकल्याण विभाग अशा विविध विभागांची बैठक घेतली. बांधकाम विभागाने विश्रामगृह परिसरात सावलीसाठी मंडप टाकावा. महापालिकेने पिण्याच्या पाण्याची सोय करावी. अॅम्ब्युलन्स तैनात ठेवावी आदी सूचना केल्या. संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात वाहनतळासाठी व्यवस्था करण्यात आल्याचे तेली यांनी सांगितले. आयोगासमोर ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणासंबंधी निवेदन सादर करायचे आहे किंवा म्हणणे मांडायचे आहे त्यांनी लेखी पुरावे आणि ऐतिहासिक दस्तऐवजांसह आयोगासमोर म्हणणे मांडण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची भूमिका आहे. आयोगासमोर समाजाच्या विविध घटकांच्या व्यथा पोहोचाव्यात यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीने विविध घटकांशी संपर्कही करण्यात आला आहे.- शहाजी पवार, भाजपा, जिल्हाध्यक्ष