सोलापूर : महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर अनेक संकटे आली. काहीवेळा तर मृत्यूही त्यांच्यासमोर उभा होता. त्याच्यावरही अमिताभ बच्चन यांनी विजय मिळविला. आता त्यांना कोरोना झाला असला तरी त्यांच्यासमोर हे फार छोटे संकट आहे. यातून ते लगेच बरे होतील, असा विश्वास अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी बोलून दाखवला. बिग ‘बी’ कोरोनातून मुक्त व्हावेत, यासाठी महामृत्यूंजय मंत्राचा जपही फॅन्सनी केला.
बच्चन यांना कोरोना झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. अनेक संकटांना पुुरुन उरणारे महानायक हे आतादेखील कोरोनाला हरवतील असा त्यांचा विश्वास आहे. अमिताभ बच्चन यांच्यामागे त्यांच्या चाहत्यांचे प्रेम असल्याने त्यांना काहीच होणार नाही, असे अमिताभ बच्चन फॅन फ्रेंडस् फॅन क्लबचे प्रदीप उमरजीकर यांनी सांगितले. त्यांच्या क्लबच्या २० सदस्यांनी मंदिरे बंद असल्याने घरी राहून देवाकडे अमिताभ बच्चन लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली.
सोलापूरचे ज्युनिअर बच्चन म्हणून ओळखले जाणारे महादेव मादगुंडी यांनीही देवाकडे प्रार्थना केली. रविवार सकाळपासून ते मृत्यूंजय मंत्राचे पठण करत आहेत. सोलापूर बच्चन फॅन्स हा अमिताभ बच्चन यांचा फॅन क्लब आहे. या क्लबच्या माध्यमातून ते विविध उपक्रम घेत असतात. सध्या अमिताभ बच्चन हे आजारी असल्याने त्यांच्या क्लबमधील सदस्यांनी आपापल्या घरी प्रार्थना केली. अमिताभ यांच्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
अभिताभ यांच्या उत्तम आरोग्यासाठी उपासनामहानायक अमिताभ बच्चन व बच्चन परिवारातील सदस्य हे कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी महाआरती करण्यात आली. विडी घरकूल येथे पद्मविभूषण महानायक डॉ. अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने इप्पाकायल यांच्या घरामध्ये श्रीलक्ष्मीनारायण व महेश्वर शंकर भगवान, आई तुळजाभवानी, मृत्युंजय महामुनी मार्कंडेय यांच्या चरणी वंदन करून महाआरती करण्यात आली. यावेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल,अंजन सज्जन, किशोर म्हेत्रे, गणेश सातालोलू, जगदीश इप्पाकायल इतर अमिताभप्रेमी उपस्थित होते.