वीजबिल वसुलीसाठी वीज मंडळाने गावागावातील शेतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. मार्डी येथील शेतीचे सर्वच ट्रान्सफार्मर बंद केले आहेत. जसे शेतकरी वीजबिल भरतील तसे ट्रान्सफार्मर सुरू केले जात आहेत. मार्डी गावालगत यमाई देवीच्या रस्त्याच्या बाजूला श्री. नागनाथ महाराज मंदिर आहे. या मंदिरालगत असलेला ट्रान्सफार्मर नागनाथ मंदिर ट्रान्सफार्मर म्हणून ओळखला जातो. तो मागील बुधवारी बंद केला आहे. याच ट्रान्सफार्मरवर ग्रामपंचायतीने कनेक्शन घेतले आहे. यासाठी ग्रामपंचायतीने ७ कनेक्शनचे ७० हजार रुपये भरले. त्यानंतर एका शेतकऱ्याने १० हजार व एका शेतकऱ्याने ४ हजार रुपये भरल्याचे शेतकरी प्रवीण काटे यांनी सांगितले. उर्वरित शेतकऱ्यांचे प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे ४० हजार रुपये भरण्यासाठी शेतकरी कारंबा व जुनी मील कंपाउंडमधील कार्यालयात मंगळवारी गेले. मात्र प्रति शेतकरी पाच हजार रुपये प्रमाणे भरा अन्यथा पैसे भरुन घेतले जाणार नाहीत, असे सांगत पैसे भरुन घेण्यास नकार दिला.
त्यामुळे श्रीक्षेत्र नागनाथ देवस्थानच्या नावाने असलेला ट्रान्सफार्मर बंदच राहिला आहे.
----
ग्रामपंचायत व शेतकऱ्यांनी अगोदर २४ हजार रुपये जमा केले आहेत. आम्ही ४० हजार रुपये घेऊन गेलो तर प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे भरा असे सांगितले. आम्ही आमदार यशवंत माने व अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर पडळकर यांनाही संपर्क केला मात्र उपयोग झाला नाही.
- प्रवीण काटे, शेतकरी, मार्डी.
----
कोट
शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना वर्षभरात कोणतेही उत्पन्न आले नाही. अशातही शेतकरी काही ना काही रक्कम भरत आहे. मात्र पैसे भरुन घेऊन वीज पुरवठा सुरू केला जात नाही. आठ दिवस झाले जनावरांना खांद्यावर पाणी आणून पाणी पाजावे लागत आहे.
- सुधीर गोरे, माजी पंचायत समिती सदस्य